आता तीस वर्षावरील सर्व नागरिकांची होणार असंसर्गजन्य आजार तपासणी जिल्हा मोतीबिंदु मुक्त करणार !
आता तीस वर्षावरील सर्व नागरिकांची होणार असंसर्गजन्य आजार तपासणी.
जिल्हा मोतीबिंदु मुक्त करणार...
नागपूर : जिल्ह्यात मधुमेह, उच्चरक्तदाब, मुख कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग हे असंसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आजार दिर्घकाळापर्यंत टिकणारे आजार आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील 30 वर्षावरील सर्व नागरिकांची पुर्वतपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. असंसर्गजन्य आजारासोबतच मोतीबिंदु तपासणीही करण्यात येणार आहे.
जगात कर्करोगामुळे आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक संघटनेच्या प्रतिनिधींनी केलेल्या 2012 च्या संशोधनानुसार, जगात कर्करोगाचे 14 लक्ष नवीन रुग्ण, कर्करोगाचे मृत्यूचे प्रमाण 82 लक्ष आणि 326 लक्ष कर्करोगाने ग्रस्त आहेत. भारतात वर्षाला 4.7 लक्ष नवीन कर्करुग्ण आढळतात, 3.5 लक्ष कर्करोगी दरवर्षी भारतात मृत्यूमुखी पडतात. भारतामध्ये स्त्रियामध्ये एकूण कर्करोगाच्या स्तन कर्करोगाचे प्रमाण 14.3 टक्के असून स्त्रियामध्ये प्रथम कंमाकावर होणारा कर्करोग आहे. तसचे गर्भाशय मुखाचा कर्करोग (12.1) टक्के दुसऱ्या क्रमांकावर येणारा कर्करोग आहे. तसेच मुखकर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या 7.2 टक्के आहे. 'भारतामध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण लोकसंख्येच्या 25 टक्के व मधुमेहाचे प्रमाण 8 ते 9 टक्के आहे.
देशात माता व बालकांच्या आरोग्याबरोबरच हिवताप, कुष्ठरोग सारख्या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणामध्ये देखील यश प्राप्त करतांना नागरिकांचा सहयोग लाभलेला आहे. परंतु आरोग्य सेवेच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने समोर उभी आहेत. समाजात उच्च रक्तदाव, मधुमेह, लखवा, कर्करोग, अस्थमा, श्वासाचे आजार, ह्दयरोग, किडनीचे आजार, मानसिक आजार आणि अपघातामुळे झालेल्या जख्मा या सारख्या आजारांनी अनेक नागरिक पीडीत आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 वर्षावरील 3 लाख 30 हजार 559 लोकांची पूर्वतपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी उच्चरक्तदाबाचे 29 हजार 48 रुग्ण, मधुमेहाचे 10 हजार 821 रुग्ण, मुखकर्करोगाचे 245 रुग्ण, स्तनकर्करोगाचे 35 रुग्ण, गर्भाशयमुख कर्करोगाचे 45 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 'भारतामध्ये 4.6 मिलीयन मोतिबिंदुचे रुग्ण असून जिल्ह्यामध्ये मोतिबिंदूचे प्रमाण सुध्दा वाढत आहे.
असंसर्गजन्य आजार हे मनुष्याच्या जीवनातील महत्वाच्या कालावधीत होतात. ही धोक्याची बाब असून अकाली मृत्यु सुध्दा होतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या आजाराची लागण होवू शकते, वृध्दापकाळात या आजारांची शक्यता जास्त असते. याबरोबरच मोतीबिंदुचेप्रमाण लक्षात घेता नागपूर जिल्हा मोतीबिंदु मुक्त करण्याचा संकल्प घेण्यात आला असून 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी असंसर्गजन्य आजाराची पुर्वतपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे .