*म.फु.कृ.विद्यापीठात फुले स्पर्धा परीक्षा फोरमची स्थापना- कुलगुरू डॉ.विलास खर्चे.*
*फुले स्पर्धा परिक्षा फोरमद्वारे शास्त्रज्ञ व अधिकारी घडतील*
*विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी फुले स्पर्धा परिक्षा फोरम उपयोगी ठरेल*
*- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 4 ऑगस्ट, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. त्यांची संभ्रमावस्था दुर होऊन त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा फुले स्पर्धा परिक्षा फोरम विद्यापीठाने स्थापन केला आहे. या विद्यार्थ्यांना करियरविषयी संपूर्ण मार्गदर्शन होण्यासाठी फुले स्पर्धा परीक्षा मंच निश्चितच उपयोगी ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाची कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा जोतीबा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त आज फुले स्पर्धा परिक्षा फोरमची स्थापना करण्यात आली. या फोरम अंतर्गत करियर संधी आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी व कुलसचिव, यशदा श्री. राजीव नंदकर, पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड, नागपूर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतंर्गत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड व आंतरविद्या शाखा जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होणार्या दीक्षारंभ कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याची आवड पाहून त्याला हवं ते देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासाठी विद्यापीठाने फुले स्पर्धा परिक्षा फोरम, उद्योजकता फोरम व हायटेक अॅग्रीकल्चर फोरमची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांसाठी आज होणार्या या कार्यशाळेसारखीच कार्यशाळा विद्यापीठातील कर्मचार्यांसाठीसुद्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आज झालेल्या या कार्यक्रमाद्वारे महात्मा फुले कृषि विद्यापीठातील फुले स्पर्धा परिक्षा फोरमची सुरुवात करण्यात आली असे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. बाबासाहेब फंड यांनी कृषि संशोधन आणि उच्च शिक्षणात करिअरच्या संधी, आव्हाने आणि धोरणे विषयावर मार्गदर्शन केले.
श्री. राजू नंदकर स्पर्धा परीक्षा आव्हाने, नियोजन आणि संधी या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की आजचे युग हे भ्रमाचे असून या भ्रमाच्या युगात प्रत्येकाची क्षमता बांधणी व्हायला हवी. प्रत्येकाने स्वतःला विकसित तसेच रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. फक्त एक विचार आपले आयुष्य बदलू शकतो. या कार्यशाळेतून तुम्ही जो स्पार्क घेऊन जाणार आहात तो तुम्ही इतर विद्यार्थ्यांना द्याल अशी मी अपेक्षा करतो. डॉ. बबनराव जोगदंड स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्रातील पहिला प्रयोग महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी महोत्सव वर्षानिमित्त फुले स्पर्धा परिक्षा फोरमच्या रूपाने या विद्यापीठात होत आहे. यावेळी त्यांनी व्यक्तीमत्व विकासाची पंचसूत्री विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. विजयकुमार पाटील यांनी मानले. या कार्यशाळेचे सहसंयोजक म्हणुन डॉ. श्रीगणेश शेळके व डॉ. सखाराम आघाव यांनी काम पाहिले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विद्यार्थी फोरमचे समन्वयक तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच 15 महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








