केंद्रीय कृषी मशिनरी संस्था बुदनीने महिलांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण सफलतापूर्वक संपन्न .

केंद्रीय कृषी मशिनरी संस्था बुदनीने महिलांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण सफलतापूर्वक संपन्न .

*केंद्रीय कृषी मशिनरी संस्था बुदनीने महिलांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण सफलतापूर्वक संपन्न*

 

विकसित भारतासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणामधून महिला योगदान देऊ शकतात- संचालक डॉ. बालाजी नांदेडे

            भारत सरकारच्या शेतीमधील यांत्रिकीकरणाच्या योजना महाराष्ट्र मध्ये या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे आहे. विविध कामांसाठी लागणाऱ्या छोट्या यंत्रांच्या वापरामुळे भविष्यात शेती मधील कामे सोपी होणार आहेत. शेतीतील विविध कामे प्रामुख्याने महिला करतात. त्यामुळे विकसित भारतासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणामधून महिला मोठे योगदान देऊ शकतात असे प्रतिपादन बुधनी येथील केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेचे संचालक डॉ. बालाजी नांदेडे यांनी केले.

          महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाद्वारे भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय कृषि मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्था, बुदनी, मध्य प्रदेश यांनी राहुरी तालुक्यातील मौजे तांभेरे या गावात महिलांसाठी तीन दिवसीय सुधारित कृषि अवजारे व यंत्रांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बुदनी येथील केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व परीक्षण संस्थेचे संचालक डॉ. बालाजी नांदेडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, बुदनी येथील केंद्रीय कृषि मशनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेचे वरिष्ठ कृषी अभियंता इंजि. व्यंकटेश शिंदे, वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक इंजी. खजेंद्र बोरा, वरिष्ठ टेक्निशियन अनिश मालविया, डॉ. महेश पाचारणे व डॉ. रविकिरण राठोड उपस्थित होते.

        डॉ. बालाजी नांदेडे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की गावातील तरुण व शिक्षित महिलांसाठी केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होईल. यावेळी त्यांनी महिलांच्या बचत गटांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या कृषी अवजारे व यंत्रे यासंबंधीच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती एस रुक्मिणी यांचे या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सचिन नलावडे मार्गदर्शन करताना म्हणाले की या प्रशिक्षणातून महिलांनी अवजारे व यंत्रे यांच्या विषयीचे तंत्रज्ञान आत्मसात केले असेल, त्याचा वापर त्यांनी आपल्या शेतीमध्ये करावा. तुम्ही वेळ काढून विद्यापीठातील कृषी अवजारे व यंत्रे प्रकल्पामध्ये भेट द्या, तेथील अधिकचे तंत्रज्ञान जाणून घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी केले. या प्रशिक्षणाचा महिलांना भविष्यात फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मे.स्टील कंपनी, पुणे यांच्यामार्फत महिलांसाठी असलेल्या विविध कृषि अवजारे व यंत्रांचे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. यावेळी इंजि. खजेंद्र बोरा, श्रीमती सुवर्णा गागरे, श्रीमती निर्मला मुसमाडे, श्रीमती लता भागवत व श्रीमती सुनिता मुसमाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती सुजाता शेंडे, श्रीमती जयश्री गागरे व श्रीमती सुवर्णा गागरे या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये तीनही दिवस कृषि अवजारांची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश पाचारणे यांनी तर आभार डॉ. रविकिरण राठोड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर ताराचंद गागरे, श्री.सलीम शेख, श्री.राहुल कोर्हाळे व श्री.किरण मगर यांचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तांभेरे गावातील 140 महिलांनी सहभाग नोंदविला.