उरळी कांचन येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बायफ संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार
*उरळी कांचन येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बायफ संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार*
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली उरळी कांचन (पुणे) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्यामध्ये स्थानिक वाणांवर आधारित स्मार्ट हवामान सुसंगत आणि जैवविविधतेला चालना देणाऱ्या पीक पद्धती विकसित करणे, मृदा आरोग्य, मृदेमधील बहुपोषक तत्त्वांची कमतरता, भूजल संशोधन, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयांवर संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत डॉ. विठ्ठल शिर्के आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग तर ट्रस्टी डॉ. भरत काकडे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी काष्टी, मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, श्री. वामन कुलकर्णी, डॉ. विठ्ठल कवठाळे, डॉ. जयंत खडसे व श्री. ज्ञानेश्वर मोरे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारांसोबत सक्रिय सहभाग घेऊन नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येईल. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीस या सामंजस्य करारामुळे मोठी चालना मिळेल. स्थानिक वाणावर आधारित स्मार्ट हवामान सुसंगत आणि जैवविविधतेला चालना देणाऱ्या पीक प्रणाली विकसित करणे, मृदा आरोग्य, मृदेमधील बहु पोषक तत्वांची कमतरता, भूजल संशोधन, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयांवर संयुक्तपणे संशोधन करण्यावर भर देण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी डॉ. भरत काकडे म्हणाले की हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान प्रतिरोधक शेती प्रणाली विकसित करणे आणि जैवतंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची स्थिती मॉनिटरिंग करणे, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण देणे तसेच कमी खर्चिक शेती ऊर्जा व ग्रामीण विकासासाठी संयुक्त उपक्रम राबविणे या गोष्टींवर विशेष भर देण्यात येईल. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी बायफ रिसर्च फाउंडेशनला भेट देऊन तेथील नैसर्गिक प्रात्यक्षिक शेती, इनोव्हेशन सेंटर, स्पाइनलेस कॅक्टस या प्रकल्पांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांना संस्थेत सुरू असलेल्या शाश्वत शेती पद्धती, हवामान सुसंगत शेती, जैवविविधता संवर्धन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची सविस्तर माहिती देण्यात आली.








