महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय संशोधन माहिती नेटवर्क -विद्वान कार्यशाळा संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय संशोधन माहिती नेटवर्क -विद्वान कार्यशाळा संपन्न .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय संशोधन माहिती नेटवर्क-विद्वान कार्यशाळा संपन्न*

*भारतीय संशोधन माहिती नेटवर्क प्रणालीद्वारे कृषी विद्यापीठाची संशोधनात राष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक बळकट होईल*

*- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान आहे. विद्यापीठातील शिक्षकवर्गाच्या संशोधन कार्याची अद्ययावत व प्रमाणित माहिती नेटवर्क प्रणाली-विद्वानद्वारे एकत्रित झाल्यामुळे विद्यापीठाची संशोधन क्षमता, शैक्षणिक कामगिरी आणि राष्ट्रीय स्तरावरील दृश्यमानता अधिक प्रभावीपणे अधोरेखित होण्यास मदत होईल. एन.आय.आर.एफ. मानांकनासाठी आवश्यक असलेल्या संशोधन, प्रकाशने, प्राध्यापकांची शैक्षणिक माहिती आणि इतर संबंधित बाबींचे अचूक व एकत्रित संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संशोधन माहिती नेटवर्क प्रणालीच्या माध्यमातून ही माहिती व्यवस्थितपणे उपलब्ध झाल्याने विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन व क्रमवारीमध्ये आपली कामगिरी प्रभावीपणे सादर करण्यास निश्चितच फायदा होईल. या कार्यशाळेच्या माध्यमातून महात्मा फुले कृषि विद्यापीठाची संशोधनात राष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक बळकट होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सर्व शिक्षकवर्गीय कर्मचार्यांसाठी भारतीय संशोधन माहिती नेटवर्क प्रणाली-विद्वान संदर्भात एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते.

 या कार्यशाळेत डॉ. साताप्पा खरबडे आणि डॉ. प्रशांत बोडके यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान विद्वान ओळख नोंदणी, शिक्षकांच्या संशोधन कार्याची प्रोफाईल निर्मिती, संशोधन कार्याचे अद्ययावतीकरण, माहिती पडताळणी याबाबत प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिक्षकांच्या संशोधनविषयक माहितीचे अचूक संकलन, अद्ययावतीकरण आणि संस्थेच्या संशोधन माहिती व्यवस्थापन प्रणालीशी एकत्रीकरण याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रक्रियेमुळे विद्यापीठातील संशोधनविषयक माहिती अधिक शिस्तबद्ध, अद्ययावत आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. एन.आय.आर.एफ. मानांकनासाठी आवश्यक संशोधनविषयक माहितीचे अचूक संकलन व सादरीकरणाच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विवेक चिमोटे, डॉ. अधीर आहेर, डॉ. नारायण मसमाडे, डॉ. अवधूत वाळुंज, डॉ. उदय दळवी आणि डॉ. अविनाश कर्जुले यांनी सक्रिय सहभाग घेत शिक्षकवर्गाला विविध तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.