महसूल व कृषी अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची- आम आदमी पक्षाची मागणी

*काटोल तालुक्यात पावसामुळे शेती गेली खरडुन महसूल अधिकारी म्हणतात नुकसान फक्त 30 टक्के
* तालुक्यातील चिखलागड येथील शेतजमीनीची झाली नदी.

काटोल प्रतिनिधी :- सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच आहे परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय व हलाखीची झाली आहे. "होते नव्हते सर्व काही खरडुन नेले"  आता मुलांचे शिक्षण, वयात आलेल्या मुलींचे लग्न व दैनंदिन खर्च या विवंचनेत शेतकरी सापडला असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुलतानी फर्मान काढून शंभर टक्केच नाही, तर अपरिमित हानी झाली असताना फक्त ३० टक्के नुकसान दाखविण्याचे निर्देश अधिनस्थ कर्मचारीवर्गाला कसे काय दिले, हा संशोधनाचा व कुतुहलाचा विषय ठरला आहे. 

तालुक्यातील चिखलागड येथील शेतजमीनीची अवस्था जर बघितली तर होत्याचे नव्हते झाले, असुन याविषयी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी वृषभ वानखेडे व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतजमीनीची पाहणी करून तलाठी पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्हाला तहसीलदार यांनी कमी नुकसान दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु तलाठी पाटील यांचा रेकॉर्ड बघता त्यांच्या नोकरीच्या कारकीर्दीत आजपर्यंत कोणत्याही शेतजमीनीची प्रत्यक्षात पाहणी केलेली नाही. 

तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न असतात त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवरच प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हवालदिल शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचे अशी अवस्था असताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे यांनी ही बाब प्रामुख्याने समोर आणली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर लवकरच धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल त्यानेही काही झाले नाही तर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.