MSEDCL : वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळणार, 2 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळणार, 2 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ !

प्रतिनिधि वाहिदशेख (ब्यूरो रिपोर्टर)नागपुर

नागपूर -: नागपूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतुन उत्तर नागपूर मतदार संघातील महावितरण संबंधित विविध विकास कामांचे भूमिपूजन ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. एकूण २ कोटी ७ लाख ८८ हजार कोटी रुपयांच्या या विकास कामात ११ नवीन रोहित्र,३३४७ मीटर उच्च दाब वाहिनी, ५७४ मिटरची लघुदाब वाहिनी व एकूण ११७ खांबांची उभारणी करण्यात येणार आहे. या विकास कामात नवीन रोहित्राची स्थापना, एरियल बंच केबलींग, स्थापित रोहित्राची क्षमता वाढविणे, अपघातप्रवण ठिकाणी उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे स्थलांतरण व उपरी वाहिनी भूमिगत करणे तसेच समाजातील विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देणे इत्यादी कामांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे या भागांतील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार,योग्य दाबासह अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन करताना कोरोना असला तरी विकास कामांचे चक्र थांबू नये याचे प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहे अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी यावेळी दिली. 

जिल्हा नियोजन समिति २०२१-२२ योजने अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात ऊर्जा विभागाची विविध विकास कामे मंजूर आहेत. यामध्ये प्रामुख्याने सामान्य विकास योजना, व विशेष घटक योजने अंतर्गत कामांचा समावेश आहे. या अंतर्गत आज १६ जानेवारी २०२२ रोजी या कामांचे भूमिपूजन ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात  आले.

या विकास कामात बजाज कॉलेज जवळ, दयानंद पार्क परिसरातील नविन २०० के.व्ही. रोहित्र, १३० मीटर भूमिगत उच्चदाब वाहिनी व १०० मीटर एरियल बंच केबलचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाची रक्कम ११.२७ लाख एवढी असून त्यामुळे परिसरातील २०० वीज ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल. कृष्णा नगर आणि शिवगिरी लेआउट, नारा येथील ८०० मीटर एरियल बंच केबल लघुदाब वाहिनी अंतर्गत नवीन १६ पोलची वाहिनी टाकण्यात येणार असून ६.३८ लक्ष रुपयांच्या या कामाचा परिसरातले २०० वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. सुशीला ले-आऊट , रिंग रोड येथे नवीन २०० केव्ही रोहित्र बसविण्यात येणार असून १९० मीटर भूमिगत उच्चदाब वाहिनी व १५० मीटर एरियल बंच केबल लघुदाब वाहिनीचे काम करण्यात येणार आहे.

त्यामुळे या परिसरातील रोहित्रा वरील अतिरिक्त भार कमी होऊन ग्राहकांना योग्य दाबाने विज पुरवठा मिळेल. या कामाची किंमत ११.९२ लक्ष रुपये एवढी असून या कामाचा लाभ परिसरातील सुमारे २०० पेक्षा अधिक वीज ग्राहकांना होणार आहे. लष्करीबागच्या श्रावस्ती बुद्धविहार जवळील इंदोरा झोपडपट्टी येथे नवीन २०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येणार असून ९.४९ लक्ष किमतेचे १५० मीटर भूमिगत उच्चदाब वाहिनीचे काम मंजूर आहे. त्याचा २०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल.

मिसाल लेआऊट मध्ये नविन २०० के.व्ही.चे रोहित्र बसविण्यात येत आहे. या कामाची प्रस्तावित किंमत ११.५९ लक्ष एवढी असून त्यामुळे अंदाजे ३०० लोकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळेल. उप्पलवाडी इंडस्ट्रियल भागामध्ये २०० केव्हीच्या रोहित्राची क्षमता वाढवून ते ३१५ केव्ही चे करण्यात येईल. या कामावरील खर्च ७.०७ लक्ष असून त्यामुळे २० पेक्षा अधिक औद्योगिक ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. पिवळी नदी,शिवनगर येथील ३१५ केव्ही रोहित्रची संरचना आणि संलग्न पायाभूत सुविधा स्थलांतरित करण्याची अंदाजे किंमत ८.८५ लक्ष एवढी असून यामुळे यापूर्वी अडगळीच्या ठिकाणी असलेल्या रोहित्र ना-दुरुस्त झाल्यानंतर ते बदली करणे अवघड होते. जे या नवीन कामामुळे सोयीचे होईल. त्यामुळे परिसरातील ५०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. 

कादरी चौकातील गुरुनानक शाळेजवळ नविन २०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येणार असून ५०० मीटर भूमिगत उच्चदाब वाहिनीचे काम मंजूर आहे. या कामावरील अंदाजे खर्च १९.०५ लक्ष एवढा आहे,या कामाचा या परिसरातील एकूण २०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. ख्रिश्चन कॉलनी मेकोसाबाग परिसरतील वीज समस्या सोडविण्याकरीता नविन २०० केव्हीचे रोहित्र उभारण्यात येत आहे. या कामाची किंमत १५.४९ लक्ष एवढी असून परिसरतील ३५० ग्राहकांना या कामाचा लाभ मिळेल. सुदामनगर, जैन लॉन जवळ ३१५ केव्हीचा रोहित्र बसविण्यात येणार असून १०० मीटर भूमिगत लघुदाब वाहिनी व १६० मीटर एरियल बंच केबल लघुदाब वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कामाची किंमत १४.१७ लक्ष एवढी आहे. त्यामुळे या भागातील ५५० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. 

सुदाम नगर, आम्रपाली बुद्धविहार परिसरतील वीज समस्या सोडविण्याकरीता नवीन २०० केव्ही चे रोहित्र बसविण्यात येणार असून १५० मीटर एरियल बंच केबल लघुदाब वाहिनीचे काम मंजूर आहे. त्यामुळे या परिसरातील दोन रोहित्राचा अतिरिक्त भार कमी होउन विज पुरवठा कमी दाबाने मिळणार्‍या तक्रारी कमी होतील. या कामावरील खर्चाची रक्कम ६.३६ लक्ष एवढी असून ३०० ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळेल. ५ स्टार बेकरी जवळ, कामठी रोड, फारूख नगर, बाबा दीप सिंग नगर येथे उपरी वाहिनी काढून ३ हजार ५० मीटर एरियल बंच केबल लघुदाब वाहिनी टाकण्यात येईल.या कामाची रक्कम १८.९२ लक्ष एवढी आहे. या कामामुळे परिसरतील १५०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. तसेच परिसरातील वीज अपघात घडण्याची शक्यता कमी होईल.

नई बस्ती, टेका, कामठी रोड परिसरात येथील २०० केव्ही चे रोहित्र स्थलांतरित करून १२५ मीटर भूमिगत उच्चदाब वाहिनी व ११२ मीटर भूमिगत लघुदाब वाहिनीचे काम करण्यात येणार आहे व १ फिडर पीलरचे काम करण्यात येणार आहे. या सर्व कामाची अंदाजे किंमत ८.६७ लक्ष एवढी आहे. त्यामुळे परिसरातील ३०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. पाचपावली, बारसे घाट, कुऱ्हाडपेठ या परिसरतील रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूचा भाग जोडण्यात येणार आहे. याकरिता नविन २६० मीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकण्यात येऊन ११ केव्ही सॉ-मील फिडर वाढविण्यात येत आहे. या कामाची एकूण किंमत १५.७६ लक्ष आहे. यामुळे या भागांतील ८०० वीज ग्राहकांना लाभ मिळेल. 

मयूर नगर, नारी रोड येथील ए आररोड फीडरच्या अपघात प्रवण ठिकाणी उच्चदाब वाहिनी ९८० मीटर व ८० मीटर लघुदाब वाहिनीचे रूपांतरित करण्याचा व उपरी वाहिनी भूमिगत करण्यात येणार असून या कामाची किंमत २८.२६ लक्ष एवढी आहे. मांडवा वस्ती, वांजरा या परिसरतील नवीन १०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येत आहे. यामुळे नवीन वीज जोडणीचे प्रलंबित असलेल्या २० अर्जदार यांना वीज पुरवठा करण्यात येईल. या करीता नवीन २६ पोलची वाहिनी उभारण्यात येऊन ३३० मीटर उच्च दाब व ५६० मिटर एरियल बंच केबल टाकण्यात येणार आहे. या कामाची एकूण किंमत १४.५५ लक्ष एवढी आहे. 

या भूमिपूजन समारंभात कृष्णकुमार पांडे,संजय दुबे बंडोपंत टेंभुर्ने,रत्नाकर जयपूरकर,सुरेश पाटील, दिपक खोब्रागडे,मुलचंद मेहेर, सतिश पाली, दिनेश यादव,नेहा निकोसे, प्रवीण मानवटकर, विजया हजारे,महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,सिव्हिल लाइन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.