*प्राणिमात्राची सुरक्षितता व सव धंरणासाठी योगदान देणे प्रत्येकाची दायित्व*

प्राणीमात्रांची सुरक्षिततासंवर्धनासाठी योगदान देणे प्रत्येकाचे दायित्व

-  शेषराव पाटील

  BPS Live news N-Delhi

  नागपूर:-प्रत्येक व्यक्तीने प्राणीमात्रांच्या सुरक्षिततेसाठी  व संवर्धनासाठी  योगदान देणे गरजेचे आहे. निसर्गाप्रती  सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सर्वांनी या कार्यास हातभार लावावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष शेषराव पाटील  यांनी उदघाटनीय भाषणात केले.

रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जैवविविधता मंडळ व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, जी.एच. रायसोनी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाकुमार, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव तथा मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, जैवविविधता व संरक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमित सेठीया, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, डॉ. विजय शर्मा, संजय पाटील, शालू कोल्हे, कौस्तुभ पांढरीपाडे, डी.पी. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

अनादि काळापासून भारतीय संस्कृतीत जैवविविधतेच्या संरक्षणासंबंधी पुरावे आहेत.   अर्थववेदात याबाबत पाच महत्व सांगितले आहे. त्यासोबत कौटिल्यांच्या अर्थशास्त्रातही याबाबत नियम व दंड सांगितले असल्याचे श्री. पाटील म्हणाले. निसर्गाच्या जनुकाचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे केल्यास 20 टक्के जमीनीवर असलेल्या जंगलांचे संरक्षण करुन मानववंशाचे अस्तित्व कायम राहील. मानवी जीवनाचा मुलाधार मधमाशी आहे, असे म्हणतात की  मधमाशी नष्ट झाल्यास चार वर्षात मनुष्य जीवन नष्ट होईल. दिवसेंदिवस अनेक प्राणीमात्रांचे नामशेष होण्याचे प्रमाण वाढत असून त्याकडे प्रकर्षाने लक्ष देवून जतन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

रासायनिक खतांमुळे अनेक जीवांच्या नाश होत आहे, त्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. भारतीच तनाचा नाश होऊन विदेशातील जलकुंर्भी वनस्पतीचे प्रमाण देशात वाढत आहे. शहर व गावातील ही वनस्पती पाण्यात वाहून पाण्यास प्रदुषित करीत आहे. याबाबत जनतेने जागृत राहणे गरजेचे आहे. मांगूर हा मासा  सुध्दा तितकाच घातक असल्याने त्यावर बंदी घातली आहे, परंतु अजुनही जनतेमध्ये जनजागृती झाली नसल्याचे दिसते. अनेक प्राणी व पक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. यासाठी मानवास गवताळ प्रदेशाचे निर्मिती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हापसुचे कुलगुरु आशिष पातुरकर म्हणाले 22 मे हा जैवविविधता दिवस आहे, परंतु आज जागतिक मधुमक्षिका दिवसाच्या दिवशीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  जगाच्या तुलनेत 50 टक्के प्राणीमात्र भारतात आहेत. याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. वातावरण, मनुष्य व प्राणी यांच्यात समन्वय साधणे महत्वाचे आहे. स्थलांतरीत पक्षामुळे सुध्दा अनेक संक्रमित रोग होण्याची भिती आहे. म्हणून वातावरण प्रदुषित होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी कुटुंबापासून जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाचे धडे मिळायला पाहीजे. त्यासोबतच शाळा, महाविद्यालयात याबाबत जागृती करणे आवश्यक आहे,  असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य सोनाकुमार यांनी जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले. याविषयावर त्यांनी इंग्रजीमध्ये  पुस्तक लिहीलेले आहे. सामान्य नागरिकांना याबाबतच्या कायद्याचे ज्ञान व्हावे, यासाठी त्यांनी हिंदी व मराठी आवृत्ती लवकरच काढणार असल्याचे सांगितले. जैवविविधता कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असून त्यामुळे मानव जातीचे रक्षण होईल,  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य संरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी  आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या महत्व पटवून देतांना जैवविविधता कायदा 2002 मध्ये मंजूर झाला असून या कायद्याच्या आधारे जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. या अंतर्गत शासनाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस पुणे व नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.  याअंतर्गत संरक्षण व संवर्धनाचे कामे ठळकपणे करण्यात येणार आहे. हा कायद्या मनुष्य जीवनाचे अस्तित्व असे पर्यंत राहणार आहे. स्वयंसेवी संघटनेने या सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये वनस्पती संवर्धन- अनंत बोये( काटोल), पारंपारिक बियाणे- अविल बोरकर ( भंडारा), अविनाश काळबांधे (उमरखेड),  तांदुळ संवर्धन-मित्रजित खोब्रागडे( नागभिड),   म्हशीचे संवर्धन-ओमप्रकाश कालोकर ( आर्वी), प्रफुल्ल सावरकर- अमरावती, देवेद्र राऊत- (गोंदिया), नरेश चरडे व चमु ( नागपूर ) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात दिल्ली येथे चित्ररथाद्वारे केलेले जैवविविधतेचे दर्शन, यशवंत ठाकूर( ब्रम्हपूरी), मंदा गावलकर( बाराभाटी),, राधेश्याम वैद्य( साकोली), रमेश व पुष्पराज साकरकार, वसंत फुटाणे ( अमरावती), धनंजय सायरे, मौजीलाल भिलावेकर, दीपक बर्डे, पक्षी संवर्धन-सावन बाहेकर(गोंदिया), अंबरीश घटाटे, होमेश्वर डांगोरे, माया बोरकर, गाय संवर्धन- दादाराव अर्बट, सुरेश बस्तावार, मारुती संगावार गजानन काळे यांचा समावेश आहे.

प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्रीमती सोनाकुमार यांच्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. दोन सत्रात आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक जैवविधितेचे प्रदर्शनी लावण्यात आले होते. या कार्यक्रमास विदर्भातील शेतकरी , वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.