कर्हेटाकळी येथे वारंवार लाईट जात असल्यामुळे गावकरी त्रस्त
क-हेटाकळी येथे वांरवार लाईट जात असल्यामुळे गावकरी त्रस्त.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शेवगाव प्रतिनिधी -यशवंत पाटेकर
: शेवगाव तालुक्यातील क-हेटाकळीमध्ये महावितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू आहे. 3 हजार लोकसंख्या असलेल्या क-हेटाकळी गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे छोटे मुल व वयस्कर नागरिक खुप त्रस्त झाले आहेत. सध्या गावातली विजेची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. आभाळ आले की लाईट बंद केल्या जाते. रात्रभर गावकर्यांना अंधारात राहावे लागते. आता चालू महिन्यात खुप गर्मी आहे. रात्र-रात्र लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. लाईट नसल्यामुळे डास चावतात त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढल आहे. गावामध्ये महावितरणचे कर्मचारी महीना संपला की बिल घेऊन येतात व वसुली करुन जातात गावातील वसुलीचे प्रमाण चांगले असतानाही येथे विजेची समस्या का भेडसावत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आत्तापर्यंत कित्येक वेळा वृत्तपत्रात बातम्या छापल्या गेल्या परंतु गावकऱ्यांचा प्रश्न काही सुटला नाही. आता ही समस्या नेमकी सांगावे तरी कोणाला असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
रोष व्यक्त
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात वाढतं तापमान आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाला आहे. त्यातच रात्रभर वीज नसल्याने पंखा, कूलर चालू नसल्याने रात्र उकाड्यात जागून काढावी लागली. महावितरणच्या या गलथान कारभाराच्या विरोधात सर्वसामान्य वीज ग्राहक रोष व्यक्त करत आहेत.