अवैध खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक; अवैध वाहतूक असूनही राहुरी पोलिस-महसूलची कारवाई नाही – चौकशीची मागणी
अवैध खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक; अवैध वाहतूक असूनही राहुरी पोलिस-महसूलची कारवाई नाही – चौकशीची मागणी
प्रसाद घोगरे | 9370328944 | Delhi 91 प्रतिनिधी | 11/03/2026
राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ अवैध खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने एका कारला धडक दिल्याची घटना घडली असून, या प्रकरणात संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर डंपरमध्ये बॉडी लेवल पेक्षा 3 फूट वरती, व परवानगीपेक्षा सुमारे चारपट जास्त खडी भरलेली होती. अशा प्रकारे ओव्हरलोड वाहतूक केल्यामुळे मोठा अपघात होऊन रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरीदेखील संबंधित वाहनावर तात्काळ कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घटनेनंतर महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी देखील तेथे पोहोचले होते. मात्र, अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्याऐवजी, मोठी मांडवली करून संबंधितांचा जबाब जवळील एका हॉटेलमध्ये नोंदवून वाद मिटला असे लिहून डंपर सोडून दिल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, महसूल कर्मचारी यांनी तहसीलदार यांना या घटनेची माहिती न देता डंपर का सोडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच पोलिस कर्मचारी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई का केली नाही, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
अवैध खनिज वाहतूक आणि ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असताना महसूल विभाग, पोलीस विभाग अशा प्रकरणांवर कठोर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार? :
या प्रकरणाबाबत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता पोलिस निरीक्षक Sanjay Thenge यांनी आपण रजेवर असल्याचे सांगत Arun Dhanwade यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर PI धनवडे यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी “मी फक्त महत्वाच्या विषयांकडे लक्ष देतो” असे सांगितल्याची माहिती मिळाली. तसेच PSI Rajendra Jadhav यांनी “मी दुय्यम कर्मचारी असून वरिष्ठांना विचारा” असे सांगितले. राहुरी पोलिस स्टेशनच्या लँडलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यावर “आम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही येथे या” असे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अवैध खडी वाहतुकीसारख्या गंभीर प्रश्नाकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे का, की आशीर्वाद देत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
महसूल विभागाकडूनही जबाबदारी टाळली? :
महसूल विभागात विचारणा केली असता महसूल सेवक Ohol यांनी तलाठी Thorath यांच्याकडे विचारणा करण्यास सांगितले. तलाठी थोरात यांनी “मी याबाबत काहीही कारवाई करू शकत नाही, तुम्ही तहसीलदारांकडे तक्रार करा” असे उत्तर दिल्याचे पत्रकार Prasad Ghogare यांनी सांगितले. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतुकीसारख्या गंभीर प्रकरणात महसूल व पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी तर महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लवकरच या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर तक्रार राज्याचे गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती पत्रकार Prasad Ghogare यांनी दिली आहे.








