गायीच्या पहिल्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन,रांगोळी, आकर्षक फुगे आणि केकची मेजवानी
प्रतिनिधी- कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. मात्र पुणे जिल्ह्यातील एका कुटुंबाने चक्क गाईचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे एखाद्या माणसाप्रमाणे शेजारी-पाजाऱ्यांना आमंत्रण देत मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.खेड तालुक्यातील येलवाडी गावातील प्रसाद सुदाम गाडे पाटील व प्रवीण सुदाम गाडे पाटील यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे. येलवाडी मधील या गाडे पाटील कुटुंबाने आपल्या लक्ष्मी गाईचा पहिला वाढदिवस साजरा केला. गाईच्या वाढदिवसानिमित्त तिला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते.यावेळी गायीचा फोटो असलेला केक तयार करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त परिसरात छान रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गाईच्या शिंगाना आकर्षक असी सजावट करण्यात आली होती. समाजामध्ये गायीबद्दल आदर व प्रेमभावनेसह जनजागृती व्हावी तसेच गोसंवर्धन व्हावे या हेतूने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.व सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या घरी एक तरी गाय पाळावी असे आवाहन ही गाडे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.या वाढदिवसावेळी गायीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी वाढदिवसानिमित्त नटूनथटून सज्ज असलेली गाय सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी उपस्थितही या कार्यक्रमामुळे भारावून गेले होते. सध्या या गायीच्या वाढदिवस सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरु आहे.