कृषि महाविद्यालय, पुणे येथे जैविक कीड नियंत्रण प्रकल्पांच्या 32 व्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन
कृषि महाविद्यालय, पुणे येथे जैविक कीड नियंत्रण प्रकल्पांच्या 32 व्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन
*जैविक घटक हे पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे*
उपमहासंचालक पीक शास्त्र डॉ. टी. आर. शर्मा*
राहुरी विद्यापीठ, दि. 20 जुलै, 2023
जैविक कीडनाशके पर्यावरणदृष्ट्या व सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टिकोनातून त्यांची टिकाऊ क्षमता, गुणवत्ता आणि अनुवंशिक शुद्धता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी भागीदारीद्वारे संशोधन व उत्पादन घेणे आवश्यक आहे. ग्रामीण युवकांना जैविक किडनाशकांचे उत्पादनाचे स्टार्टअप सुरू करण्यामध्ये मोठी संधी आहे. जैविक घटक हे पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक पीक शास्त्र डॉ. टी. आर. शर्मा यांनी केले.
बंगलोर येथील भाकृअप राष्ट्रीय कृषि कीटक संसाधन ब्युरो आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्पाच्या दोन दिवसीय 32 व्या वार्षिक आढावा बैठकीचे उदघाटन कृषि महाविद्यालय, पुणे येथे झाले. प्रमुख मार्गदर्शन करतांना नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक पीक शास्त्र डॉ. टी. आर. शर्मा ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पीक संरक्षणाचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस.सी. दुबे, संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, बेंगलोर येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-जैविक नियंत्रण आणि राष्ट्रीय कृषि कीटक संसाधन ब्युरोचे संचालक डॉ. एस.एन. सुशील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व डॉ. बी.ए. बढे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कीटकांच्या प्रादुर्भावामुळे जगातील एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 40% उत्पादनाची नासाडी होते. तसेच टोळझाडीमुळे अन्नधान्यची नासाडी होते. कीटकांच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांची फवारणी केली तर पर्यावरणदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या हानिकारक असते. शेतीच्या शाश्वत उत्पादनासाठी जैविक घटकांचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. उपयुक्त कीटक हे उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी स्थानिक जैविक घटकांची ओळख, त्यांचे उत्पादन व त्यांचे शेतकर्यांपर्यंत वितरण होणे आवश्यक आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाद्वारे यावर्षी 100 टन जैविक किडनाशकांचे उत्पादन केले असून पुढील वर्षी 150 टन जैविक कीडनाशकांचे उत्पादन घेण्याचे लक्ष आहे. याप्रसंगी डॉ. दुबे म्हणाले जैविक कीडनाशके हे वापरण्यासाठी फार सोपी, सुरक्षित व कमी खर्चिक असतात. यामुळे शाश्वत उत्पादनासाठी व सेंद्रिय शेतीसाठी जैविक कीडनाशकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जैविक घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्यासाठी शेतकर्यांच्या शेतावर जैविक घटकांचे प्रात्यक्षिक घेणे गरजेचे आहे. डॉ. एस. एन. सुशील यांनी मागील वर्षाचा अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प जैविक नियंत्रण याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी. एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कोईमतुर येथील तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प जैव नियंत्रण प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. या कार्यशाळेला देशभरातून 13 राज्यातून 36 भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पातील 70 शास्त्रज्ञ सहभागी झालेले आहे. यावेळी कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सताप्पा खरबडे, रांची येथील कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जी एस दुबे, माजी अधिष्ठाता डॉ. अजित चंदेले, वाराणसी येथील पीकसंरक्षण विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ए.बी. राय, माजी विभाग प्रमुख डॉ. दादाभाऊ पोखरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी आणि आभार डॉ. संतोष मोरे यांनी मानले.