प्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे
*प्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी*
*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 सप्टेंबर, 2024*
आवळा फळ हे बहुगुणी आहे. या फळातील अनेक औषधी गुणधर्मामुळे प्रक्रियायुक्त पदार्थाना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळ्याचे किंवा आवळ्यापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन फायदयाचे असल्याने आवळा प्रक्रियेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागात आवळा फळप्रक्रिया या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि.23 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आवळा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना त्याच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड, काढणीपश्चात तंत्रज्ञान केंद्रांचे प्रमुख डॉ. जितेंद्र ढेमरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब भिटे व अर्थशास्त्र विभागातील कृषि संशोधन अधिकारी डॉ. जितेंद्र दोरगे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. विक्रम कड म्हणाले की सुशिक्षितांना प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण, तांत्रिक सेवा व सल्ला उपलब्ध करून त्यांना स्वतःचा प्रक्रिया लघुउद्योग सुरू करण्यास प्रवृत्त करणे आणि या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उददेश्य आहे. फळ प्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या विभागाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान आवळा कॅन्डी, आवळा गर, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा पावडर, आवळा लोणचे, आवळा सिरप व स्क्वॅश इ. पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणार्थ्यांना शिकविण्यात आले. त्याबरोबरच आवळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी, प्रक्रिया पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, उद्योगाची नोंदणी याबरोबरच प्रक्रिया उद्योगातील अडचणी व त्यावरील उपाययोजना याबदद्ल देखील माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगांव, पालघर, पुणे आणि अहमदनगर या जिल्हयातून प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. राहुल घुगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सविता धनवडे, श्री. गोरक्षनाथ चौधरी, श्री. पोपट खर्से व श्री. सुभाष माने यांनी परिश्रम घेतले.