लोकशाही भारताचे मूळ शिवभारतात आहे. सत्येंद्र तेलतुंबडे.
लोकशाही भारताचे मूळ छ. शिवरायांच्या चरित्रात आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक सत्येंद्र तेलतुंबडे यांनी केले. ते भारत मुक्ती मोर्चा चे विद्यमाने आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन,सत्यशोधक समाज स्थापना दिन, संकल्प दिन आणि पुणे करार दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
सदर कार्यक्रम संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक योगा भवन येथे आयोजित केला होता. प्रमुख अतिथी म्हणून राहुरी ज्येष्ठ समाजसेवक शिरीष गायकवाड ,म. फुले समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे होते. सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी केले. सत्येंद्र तेलतुंबडे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आणि अधिकृत चरित्र परमानंद पुरी यांनी 'शिवभारत' नावाने लिहिले. परमानंद यांना शहाजीराजे यांनी हे चरित्र लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी आपल्या निजाम राजवटीतील नेवासा तालुक्यातील काही गावाचा महसूल परमानंद यांना दिला. शिव भारत हे चरित्र महाराष्ट्रातील पेशव्यांनी गायब केले परंतु शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांच्या तंजावर संस्थानांमध्ये त्याची एक प्रत उपलब्ध झाली. गागाभट्ट व त्याच्या पुरोहितांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने स्वराज्याची मोठी संपत्ती लुबाडली. परिणामी राजमाता जिजाऊंचे निर्वाण झाले. श्रमण संस्कृतीतील रयत अस्वस्थ झाली. त्यामुळे निश्चलपुरी यांनी 24 सप्टेंबर 1674 ला शाक्त शिवराज्याभिषेक केला. त्याच दिवशी कुळवाडी भूषण शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा फुले यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
त्याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बडोदे संस्थानातील पंतांच्या छळाला कंटाळून 1917 ला राजीनामा दिला. आणि आपले उर्वरित जीवन समाज व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी संकल्प केला. तर उपेक्षित घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा गांधीजी आणि डॉ आंबेडकर यांच्यामध्ये 1932 ला पुणे करार झाला. या सर्व घटना श्रमण संस्कृतीच्या लढ्याचे मानबिंदू आहेत. याच संघर्षाचा संविधानात्मक लोकशाही भारत हा कळस आहे. सामाजिक प्रबोधनाचा पाया मजबूत केला तरच हा कळस दिवसेंदिवस चमकत राहील असे प्रतिपादन शेवटी सत्येंद्र तेलतुंबडे तुमच्या यांनी केले.ज्येष्ठ समाजसेवक शिरीष गायकवाड यांनी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकत संकल्प दिनाचे महत्त्व सांगितले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ.जालिंदर घिगे यांनी गणमाता आणि त्यांचे वैदिकांनी केलेले विकृतीकरण याची माहिती दिली. याप्रसंगी माजी प्राचार्य सुभाष पोटे ,सत्यशोधक लहुजी सेनेचे कांतीलाल जगधने, सुगी फाउंडेशनचे संदीप कोकाटे, रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव,संविधान बचाव चळवळीचे बाबा साठे,मेघराज बचुटे, एमआयएम चे इम्रान भाई देशमुख, समतादूत एजाज पिरजादे,सतीश फुलसौदर, बंडू आनंदकर,महेश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.