महात्मा फुले कृषी विद्यापीठात आठ अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आठ अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त .

*आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे*

*- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑक्टोबर, 2024*

 विद्यापीठाने आजपर्यंत केलेल्या यशस्वी वाटचालीमध्ये विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आहे. कर्मचारी हेच कृषि विद्यापीठाचे आधारस्तंभ आहेत. आपण नौकरीत असताना कशाप्रकारे काम करतो हे फार महत्त्वाचे आहे. आपण करीत असलेले काम प्रामाणिकपणे, निष्ठेने व वेळेवर केल्याने केलेल्या कामाचे समाधान मिळते. फक्त वैयक्तिक स्वार्थ न पाहता सर्वांचे हित लक्षात घेऊन आपण काम करत असलेली संस्था मोठी कशी होईल हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. आपण किती जगलो त्यापेक्षा आपण कसे जगलो याला महत्व असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार व सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

 यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. दिलीप पवार म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये माझ्याकडून जे संशोधनात्मक काम झाले आहे त्यामध्ये माझ्या सहकार्यांचे पूर्ण श्रेय आहे. विद्यापीठात केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान आहे. निसर्गाचे सूत्राप्रमाणे तुम्ही जीतके द्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला प्राप्त होते. मी आयुष्यात याच सूत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जमिनीतील माती ज्याप्रमाणे पौष्टिक असते, विविध गुणधर्मांनी युक्त असते त्यावेळेस तिच्यातून उगवणार्या पिकाचे उत्पादन चांगले येते, त्याप्रमाणे विद्यापीठाची संस्कृती चांगली असल्यामुळे या विद्यापीठाने केलेल्या संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये उच्च स्थान प्राप्त केले आहे. डॉ. गोरक्ष ससाणे यांनी यावेळी बोलताना डॉ. दिलीप पवार, डॉ. दिपक दुधाडे यांच्या विद्यापीठातील कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राहुरी, धुळे, कोल्हापूर व पुणे या चार विभागातील 8 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणारे डॉ. दिलीप पवार, डॉ. दिपक दुधाडे व श्री. अरविंद क्षीरसागर या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. 

 यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांच्या कार्यतत्परतेमुळे सेवानिवृत्त होणार्या या अधिकारी व कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करण्यात आले. याप्रसंगी डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. विजू अमोलिक, डॉ. सचिन नलावडे, डॉ. महावीरसिंग चौहान, डॉ. रवी आंधळे, डॉ. नितीन दानवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. दिपक दुधाडे व श्री. अरविंद क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (प्रशासन) श्री. सागर पेंडभाजे, श्री. बाळासाहेब पाटील, श्रीमती शैला पटेकर व श्रीमती शिल्पा चतारे यांनी अथक परिश्रम घेतले.