महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ,पुणे व आय.आय.केअर फाउंडेशन,नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे व आय.आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार
राहुरी विद्यापीठ, दि. 25 सप्टेंबर, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे व आय.आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. विनायक काशीद, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे संचालक प्रा. राजेश जालनेकर, आय.आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबईचे संचालक डॉ. संतोष भोसले, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात काळाची गरज पाहता कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार करताना लागणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता तंत्रज्ञानाच्या वापराने कमी करता येईल तसेच संशोधनासाठी लागणारे तंत्रज्ञान अत्याधुनिक असल्यास त्यामधील अचूकता वाढून हवामानातील बदलासंबंधीच्या अभ्यासांमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो असे मत व्यक्त केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेती क्षेत्रातील योगदानाची माहिती देताना त्यांनी ऊस पिकाचा उल्लेख करत देशातील ऊस पिकाखालील 80 टक्के क्षेत्र हे विद्यापीठांतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे निर्मित झालेल्या 17 वाणांसाठी असल्याचे आवर्जून नमूद केले. शाश्वत कृषि उत्पादन व पाचट व्यवस्थापनाची पद्धती अंगीकारावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. तुषार पवार यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकरी व ऊस कारखानदारांचे प्रश्न यांची सांगड घालून यासंबंधी उपाय करण्याची गरज व्यक्त केली. श्री. विनायक काशीद यांनी आपल्या मार्गदर्शनात सध्या पावसाच्या वितरणातील असमतोलाचा उल्लेख करत दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र कमी होत आहे याकडे लक्ष वेधले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत विद्यापीठाचे तंत्रज्ञान दूरवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कृषिच्या विद्यार्थ्यांनी बाहेर देशातील कृषि शिक्षणातील संधी शोधून त्याचा उपयोग करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच यासंदर्भात शिष्यवृत्तीद्वारे चांगली संधी मिळू शकते असे मत व्यक्त केले. प्रा. राजेश जालनेकर यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वाटचालीचा आढावा घेत शेतीप्रधान क्षेत्रामध्ये पिकांसाठी बाष्पीभवन अतिशय महत्त्वाचा भाग असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसेच वेगवेगळ्या प्रकारची गणकतंत्राचा ऑनलाइन वापर करून बाष्पीभवन अचूकपणे काढण्याच्या प्रकल्पासाठी हा सामंजस्य करार केल्याचे नमूद केले. डॉ. संतोष भोसले यांनी आय. आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबईच्या सामंजस्य कराराचे स्वरूप स्पष्ट करताना ऊस उत्पादक व साखर कारखान्यांमध्ये लागणाऱ्या विविध सॉफ्टवेअर्स विकसित करून त्याद्वारे अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महानंद माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय पाटील यांनी तर आभार डॉ. दीपक सावळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रेचे कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते, ॲग्री ओव्हरशेयर श्री. प्रसाद सावंत, दौंड शुगर्स प्रा. लि. चे पूर्णवेळ संचालक श्री. शहाजीराव गायकवाड, ऊस विकास अधिकारी श्री. संदेश बेनके, श्री. अंबालिका शुगर प्रा. लि. कर्जतचे सरव्यवस्थापक श्री. सुरेश शिंदे, ऊस विकास अधिकारी श्री. दादासाहेब शिंदे, जयवंत शुगर लि. चे मुख्य शेती अधिकारी श्री. राम पाटील, द्वारकाधीश साखर कारखाना लि. नाशिकचे तसेच आदिवासी सहकारी साखर कारखाना साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. सर्जेराव गांगुर्डे, श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नरचे ॲग्री ओव्हरशेयर श्री. मोहन जाधव, युटोपियन शुगर्स लिमिटेड मंगळवेढाचे ऊस विकास अधिकारी श्री. महेश पाटील, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगलीचे ऊस विकास अधिकारी श्री. हनुमंतराव सूर्यवंशी, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना जालनाचे ॲग्री ओव्हरशेअर श्री. सुरेश बोडके, पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. हिंगोलीचे ऊस विकास अधिकारी श्री. संदीप देशमुख, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज अहमदपूर, जि. लातूरचे ऊस विकास अधिकारी श्री. यशवंत टाले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना लातूरचे ॲग्री ओव्हरशेयर श्री. गोपाळ शितोळे आणि नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, कळंब, जि. धाराशिवचे ऊस विकास अधिकारी श्री. शिवप्रसाद येळेकर, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे प्रा. व्ही. एस. देशपांडे, संचालक, प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रा. परीक्षित महाले, अधिष्ठाता प्रा. दीक्षित, प्रा. महाजन, प्रा. कुलकर्णी, प्रा. शिंदे, प्रा. खेडेकर, कृषि महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुणे कृषि महाविद्यालयाचे मृदाशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र कुमार फाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.