*दुर्गम व डोंगराळ भागात देखील तुरीचे विक्रमी उत्पादन शक्य-डॉ.चांगदेव वायाळ.*

*दुर्गम व डोंगराळ भागात देखील तुरीचे विक्रमी उत्पादन शक्य-डॉ.चांगदेव वायाळ.*

कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास एकरी १४ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादनाचा विश्वास – डॉ. चांगदेव वायाळ

             डोंगराळ आणि दुर्गम भागात शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या तुरीच्या सुधारित वाणांची निवड आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब केल्यास अशा भागातील आदिवासी शेतकरीही तुरीचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतात. नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुरीच्या पिकात केलेली प्रगती प्रत्यक्ष पाहून आनंद झाला, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ यांनी केले.

           पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप उपक्रमांतर्गत नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील विविध शेतकरी गटांच्या तुरीच्या पिकांची पाहणी तसेच तुरीवरील कीड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक भूषण ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात डॉ. वायळ यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले.

        यावेळी डॉ. वायळ म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संचलित फार्मर कप स्पर्धेअंतर्गत दर आठवड्याला आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन डिजिटल शेती शाळेत सहभागी होऊन शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुरीच्या सुधारित वाणांची निवड, लागवड, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीपर्यंतचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच चांगले परिणाम मिळत आहेत. शास्त्रीय पद्धतीने शेती केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होणार असून, या शेतकऱ्यांकडून एकरी १४ क्विंटलपेक्षा अधिक तुरीचे उत्पादन मिळेल, असा विश्वास डाँ.वायळ यांनी व्यक्त केला.

         या भेटीदरम्यान डॉ. वायळ यांनी नंदुरबार जिल्ह्य़ातील कुंडमाऊली शेतकरी गटाचे निमंत्रक रविंद्र चौधरी, जागृती महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक अनिता भामरे, आयडी माता महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक मिना निकुंभ आणि धुळे जिल्ह्य़ातील भटाई माता सेंद्रिय शेतकरी गटाचे निमंत्रक सुनिल पाटील व शशीकांत पाटील यांच्या तुरीच्या पिकांची पाहणी करून कीड व रोग नियंत्रणासह पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर स्वप्नील गोसावी, गोपाल पाटील, केतन पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अर्जुन पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक भूषण ठाकरे यांनी केले.

चौकट

मोबाईल रेंज नसतानाही ज्ञानाची शेती!

         कुंडमाऊली शेतकरी गटाचे निमंत्रक रविंद्र चौधरी यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांची जिद्द सांगताना म्हटले की, आमचे गाव पूर्णपणे डोंगराळ आणि दुर्गम असून गावात केवळ तीन ते चार ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन शेती शाळेत सहभागी होणे आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधणे मोठे आव्हान होते. मात्र, या अडचणीवरही आम्ही मात केली. शेती शाळेच्या दुसऱ्या दिवशी सर्व शेतकरी मोबाईल नेटवर्क उपलब्ध असलेल्या उंच डोंगरावर एकत्र येतात. मागील दिवशी शास्त्रज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे रेकॉर्डिंग यूट्यूबवरून डाउनलोड करून घेतात आणि त्यानुसार तुरीच्या पिकाचे व्यवस्थापन करतात.