आजची तरुणाई हिच राष्ट्राची खरी संपत्ती - प्रा .डॉ संभाजी दराडे !

आजची तरुणाई  हिच राष्ट्राची खरी संपत्ती - प्रा .डॉ संभाजी दराडे !

प्रतिनिधी //अहिल्यानगर

आजची तरुणाई हीच राष्ट्राची संपत्ती असल्याचे प्रतिपादन सोनई महाविद्यालयाचे इतिहास विभाग आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संभाजी दराडे यांनी केले. ते माका येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आयोजित देडगाव येथे सुरू असलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात "शाश्वत विकास आणि आजचा युवक" या विषयावर बोलत होते. यावेळी डॉ. दराडे म्हणाले की, आजचा युवक हा ऊर्जावान, तंत्रज्ञानस्नेही, विचारशील आणि परिवर्तनशील आहे. आजची तरुणाई हीच देशाची खरी संपत्ती असून तेच देशाचा शाश्वत विकास करू शकतात. आजच्या तरुणांनी विधायक दृष्टिकोन बाळगल्यास शाश्वत विकासाबरोबर राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल. शाश्वत विकास म्हणजे सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर गदा येणार नाही. पर्यावरण व हवामान बदल, सामाजिक विकासाबरोबर कौशल्य विकास, स्टार्टअप व स्वयंरोजगार, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, गरिबी निर्मूलन, स्वच्छता, पाणी बचत, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त अभियान, डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहभाग, मतदान व राजकीय जागरूकता, पारदर्शकता व भ्रष्टाचारविरोध, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सहभाग वाढविल्यास तरुण शाश्वत विकासात महत्वाची भूमिका बजावू शकतो.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी म्हटले की, निसर्ग वाचवा म्हणजे भविष्य वाचवा. हे युवकांनी कृतीतून दाखविले पाहिजे. नोकरी शोधणारा युवक न राहता नोकरी देणारा युवक झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण, सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव असेल तर युवक कोणतेही आव्हान सहज पार करू शकतो आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान देईल. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. निपुंगे, सूत्रसंचालन प्रा. दरंदले तर आभार प्रा. गायके मॅडम यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.