आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याच्या संवर्धनाची गरज - कुलगुरू डॉ. शरद गडाख

*आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे संवर्धन करुया**- कुलगुरु डॉ. शरद गडाख*
2025 जागतीक जल दिनाची थीम हिमनदी संवर्धन आहे. पृथ्वीतलाचा 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. या 70 टक्क्यापैकी 3 टक्के हा गोड्या पाण्याचा साठा आहे. या गोड्या पाण्याच्या साठ्यातून फक्त 0.5 टक्के पाणी भुपृष्ठावर उपलब्ध स्वरुपात आहे. दिवसेंदिवस हे पाणी कमी होत आहे. या पाण्याचा महत्वाचा स्त्रोत हिमनद्या आहेत. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी डिजीटल अॅग्रीकल्चर, कृत्रिम बुध्दीमत्ता, स्मार्ट शेती, सूक्ष्म सिंचन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे संवर्धन करुया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि भारतीय कृषि अभियांत्रिकी संस्था, राहुरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक जल दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरु महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन वॉटर संस्थेचे संचालक इंजि. संदिप जाधव उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे व कृषि यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा भारतीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे सचिव डॉ. सचिन नलवडे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना इंजि. संदिप जाधव म्हणाले मागील पाच वर्षात सगळ्यात जास्त हिमनद्यांचे बर्फ वितळले आहे. असेच जर सुरु राहिले तर 21 व्या शतकात सर्व बर्फ वितळण्याच्या स्थितीत राहिल. पाण्याच्या अतिवापरामुळे दोन दशकात जमिनीतील पाण्याची पातळी दोन मिटर खाली गेली आहे. आजुनही देशातील 16 करोड जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. यासाठी शेती व इतर क्षेत्रात पाण्याचा ताळेबंद गरजेचा आहे. आता वेळ आली आहे शेती, माती, पाणी, शेतकरी यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निसर्गाचा र्हास मनुष्याने केला आहे, म्हणुन निसर्गाच्या संवर्धनाची जाबाबदारी मनुष्याचीच आहे. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे आणि डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रविंद्र बनसोड यांनी केले. याप्रसंगी गेट परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुरज गडगे, सोहन मोरे आणि विशाल हराळ यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर महाविद्यालय, कृषि अभियांकित्री महाविद्यालयाचे विद्यार्थी, अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार डॉ. सचिन नांदगुडे यांनी मानले.