२० वर्षांनी शाळेचे वर्गमित्र आले एकत्र!!! -शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा देत उलगडला एकमेकांचा प्रवास...
खंडाळा : ( प्रतिनिधी) खंडाळा येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या थाटामाटात गावात संपन्न झाला. हा मेळावा सध्याचा नव्हे तर तब्बल वीस वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सन २००३-०४ च्या बॅचचा होता.
२००३-०४ च्या दहावीच्या बॅचचा शालेय प्रवास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या वेगळ्या वेगळ्या वाटेला निघून गेले. यातील काही जण इंजिनियर झाले, काही जणांनी व्यवसाय सुरू केले तर काहीजण सामाजिक व राजनीतिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले. काहींनी आपल्या वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली. काळाच्या ओघात सर्वांची लग्न झाली मुलेबाळे झाली. मग त्यांचा शिक्षण, करियर व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना २० वर्षे कसे भुरकून निघून गेले हे कोणाला समजले नाही. हे सर्व विद्यार्थी आज मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत एकत्र आले.या मेळाव्याची सुरुवात जणू काही शाळाच भरली अशा पद्धतीने झाली.सर्व माजी विद्यार्थी पांढरा शर्ट घालून आले होते. सकाळच्या प्रार्थनेने व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झाली.
यानंतर ज्यांनी अविरत असे ज्ञानदानाचे कार्य केलं अशा सर्व शिक्षक वृंदांचा यावेळी सत्कार करून भेटवस्तू त्यांना देण्यात आली. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना भेट म्हणून एक झाड व पाण्याची बॉटल देण्यात आली.यावेळी शिक्षक कडनोर जालिंदर,डहाळे संदीप,गोडे मधुकरराव,घोरपडे सूर्यभान,सौ शेलार प्रबोधिनी,सौ सदावर्ते शैलज,श्री रंधे,श्री फुंगे, सौ पालवे,श्री छलारे, सौ पवार,श्री आढाव,चव्हाण,शेलार राऊत,कवडे,सदावर्ते आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेप्रती असणारी आपुलकी म्हणून सन २००३-०४ च्या बॅचने शाळेच्या रंगरंगोटीसाठी ₹ २००००/- हजाराची देणगी शाळेला दिली. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.