जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

*जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

            हवामान बदलामुळे कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. या कमी कालावधीतील पडणार्या जास्त पावसामुळे जमिनीची धुप होत आहे. विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होवून जमिनीचे आरोग्य खालवत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेची मागिल वर्षाचा जागतीक मृदा दिनाची संकल्पना मातीची काळजी-मापन, निरिक्षण आणि व्यवस्थापन यावर आधारीत होती. जमीन सुपीक तर त्यामधुन मिळणारे अन्न हे सकस राहिल. सकस अन्न मिळाले तर आपण सुदृढ राहु. यासाठी केंद्र व राज्य शासनाने पोकरा, जैविक शेती मिशन इ. विविध योजना मृदा संवर्धनासाठी सुरु केल्या आहेत. जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

           महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान विभागांतर्गत भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा, राहुरी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती आणि उपजीविकेची सुरक्षासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए. वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश्मी दरड, नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन नियोजनाचे संचालक डॉ. एन.जी. पाटील, अकोला कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि नवी दिल्ली येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही.के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, मृदविज्ञान विभाग प्रमुख आणि भारतीय मृद विज्ञान संस्था, राहुरी शाखेचे अध्यक्ष डॉ. भीमराव कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

              प्रमुख मार्गदर्शन कदतांना पद्मश्री डॉ. पोपटराव पवार म्हणाले अन्नाचे दूर्भीक्ष होते त्यावेळी हरितक्रांती झाली आणि उत्पादन वाढले. पण यामुळे जमिनीचे आरोग्य खालावले. निसर्गाचा आणि जमिनीचा र्हास इतका झाला आहे की यामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. पंजाबसारखी कँन्सर रेल्वे आता प्रत्येक राज्यात सुरु होण्याच्या स्थितीत आहे. यासाठी जे निसर्गातून आपण घेतले आहे ते निसर्गाला येत्या 25 वर्षात दिले तरच आपण जगू. यासाठी जमिनीची काळजी घेवून माती संवर्धन करणे हे अत्यावश्यक झाले आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना अकोला कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख म्हणाले मागिल दोन दशकापासून मातीचे आरोग्य खराब होत आहे. अन्न सुरक्षेपेक्षा माती सुरक्षा ही अती महत्वाची आहे. यामुळेच उत्पादन वाढुन अन्न सुरक्षा प्राप्त होऊ शकते. दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे म्हणाले आपण अॅग्रो इकोसिस्टीमपासून ते अॅग्रो इंडस्ट्रीकडे वाटचाल केली आहे. यामुळेच मातीशी निगडीत बर्याच समस्या उद्भवत आहेत. शाश्वत उत्पादन म्हणजेच नैसर्गिक संपत्तीचा संवर्धन करुन जास्त उत्पादन घेणे. मातीच्या संवर्धनासाठी सगळ्यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. सहाय्यक महासंचालक डॉ. ए वेलमुरुगन म्हणाले की माती संदर्भात बरेच संशोधन झालेले आहे. हे संशोधन कृतीत येणे गरजेचे आहे. आचार्य पदवीच्या आणि एम.एस.स्सी.च्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि कंपन्यांच्या गरजेनुसार संशोधन करावे. याप्रसंगी सौ. रश्मी दरड व डॉ. एन.जी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

           

 कार्यक्रमाची सुरुवात मातीचे पुजन करुन करण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुस्तके व घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी भारतीय मृद विज्ञान संस्थेचा मानाचा समजला जाणारा उषा झेंडे पुरस्कार-2024 डॉ. अनिल दुरगुडे यांना तर मृदगंध पुरस्कार-2024 डॉ. नितीनकुमार रणशुर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई आणि आभार डॉ. रितू ठाकरे यांनी मानले. या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादामध्ये राज्यातून 350 शास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच उद्योजक व शेतकरी सहभागी झाले आहेत. या दोन दिवसीय परिसंवादात बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये मृदा व्यवस्थापन, माती व पाणी संवर्धन, जमिनीतील जैवविविधता, डिजिटल सॉईल सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मृदविज्ञानामध्ये वापर करणे, सेंद्रिय शेती, काटेकोर शेती, क्षारयुक्त जमिनींचे व्यवस्थापन, मृद सर्वेक्षण व भूमि नियोजन व माती मृदव्यवस्थापना संदर्भातील धोरणात्मक निर्णय या विषयावर झालेले संशोधन याविषयीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिसंवादामध्ये शेतकरी आणि खाजगी कंपन्यांशी सुसंवादाचे आयोजन केलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय मृद विज्ञान संस्था राहुरी शाखेचे अध्यक्ष डॉ. भिमराव कांबळे, सचिव डॉ. रितु ठाकरे, खजिनदार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी परिश्रम घेतले.