शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी व्दीतीय शिक्षण म्हणजेच ध्यानधारणा हाच उत्तम पर्याय. कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील.

शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी व्दीतीय शिक्षण म्हणजेच ध्यानधारणा हाच उत्तम पर्याय. कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील.

*राहुरी विद्यापीठ, दि. 17 डिसेंबर, 2024*

 कामाच्या अति व्यापाने शरीर तसेच मनावर विपरीत परिणाम होत असतात. विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक तसेच विद्यार्थीसुध्दा कार्यालयीन कामामुळे अथवा अभ्यासामुळे तणावाची स्थिती अनुभवतात. त्यामुळे त्यांच्या कार्यालयीन कामावर तसेच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. पर्यायाने त्यांच्यामध्ये नकारात्मक विचार वाढून त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर होतो. यावर द्वितीय शिक्षण म्हणजेच ध्यानधारणा हाच उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासाठी द्वितीय शिक्षण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणुन देहरादून येथील श्री. सुदर्शन शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व कुलसचिव डॉ. नितीन दानवले उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की आपल्या मनात सर्व वेळ विचार येत असतात. त्यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त विचार हे नकारात्मक असतात. त्या नकारात्मक विचारांचा वाईट परिणाम आपल्या शरीरासह मनावर होत असतो. त्यामुळे जे पहाल, ऐकाल ते सकारात्मकच पहा. त्याचा प्रभाव तुमच्या अंतर्मनावर पडेल व तुमचा तो दिवस चांगला जाईल. फक्त ध्यानधारणा करुन आपल्याला आपले ध्येय साध्य होणार नाही तर ते ध्येय साध्य करण्यासाठी कराव्या लागणार्या कठोर परिश्रमासाठी ताकद फक्त ध्यानधारनेतुनच मिळेल असे ते यावेळी म्हणाले. व्याख्याते श्री. सुदर्शन शर्मा यांनी यावेळी द्वितीय शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करतांना नकारात्मक व सकारात्मक विचार यांचा आपल्या दैनंदिन जीवनातील प्रतिक्रिया व प्रतिसाद याच्यावर कसा परिणाम करतात हे सांगितले. द्वितीय शिक्षणाच्या माध्यमातून आपण सकारात्मक विचार तसेच ध्यानधारणा यांच्या साधनेतून स्वअनुभूती कश्याप्रकारे जागृत करु शकतो याविषयी मार्गदर्शन केले. माणसाने भौतिक विकास खुप केला आहे परंतु आत्मीक विकासावर जास्त भर देण्याची गरज असून त्यासाठी द्वितीय शिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 

 यावेळी ॠषिकेश येथून स्वामी ब्रम्हानंद व ऑस्ट्रेलिया येथून स्वामी शंकरानंद यांनी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. रवि आंधळे यांनी तर आभार डॉ. साताप्पा खरबडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता तसेच विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.