तक्षशिला शाळेत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साधला न्यायाधीश हस्तेकर यांच्याशी संवाद.
तक्षशिला शाळेत कायदेविषयक जागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांनी साधला न्यायाधीश महोदयांशी मुक्त संवाद
नेवासा तालुका वकील संघ आणि विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश नेवासाश्री. आर. आर. हस्तेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायाधीश हस्तेकर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून जागृत नागरिक होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ज्या समाजात नागरिक कायद्याबद्दल जागरूक असतात, तिथे कायद्याचे पालन अधिक प्रभावीपणे होते. त्यांनी सरकारतर्फे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कायदेशीर सेवांची माहिती दिली.

*विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्यायाधीशांचे दिलखुलास उत्तर*
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तक्षशिला शाळेतील विद्यार्थ्यांनी न्यायाधीश हस्तेकर यांची घेतलेली मुक्त मुलाखत होती. विद्यार्थ्यांनी 'तुम्ही न्यायाधीश होण्याचा निर्णय का घेतला?', 'न्यायाधीश होण्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे?', 'कायदा आणि नियम यांच्यातील फरक काय आहे?', 'मुलांचे कायदेशीर हक्क आणि जबाबदाऱ्या काय आहेत?', 'सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?', 'समाजातील गरीब लोकांसाठी सरकार काय उपाययोजना करते?' आणि 'विद्यार्थी म्हणून आम्ही समाजासाठी काय करू शकतो?' असे अनेक प्रश्न विचारले. न्यायाधीश हस्तेकर यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.

या कार्यक्रमात नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. अजय रिंधे, अँड. ए. वाय. पालवे, अँड. पी. सी. नाहार आणि अँड. गोकुळ भाताने यांनीही कायद्याच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम यांनी केले, तर शाळेचे प्राचार्य विठ्ठल कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांजली दळवी यांनी केले. यावेळी शाळेच्या संचालिका शुभांगी कदम, पत्रकार इनुस भाई पठाण, पत्रकार विष्णू मुंगसे आणि ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्यासह न्यायालयीन अधिकारी, वकील संघाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप खाटीक, मयुरी पवार आणि समन्वयक जॉन दळवी व कल्पना पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.










