*आपत्ती व्यवस्थाप नाचा चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी आर .विमला यांनी दाखल हिरवी झेंडी*

नागपूर

*आपत्ती व्यवस्थापनाच्या चित्ररथाचा शुभारंभ
 जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दाखविली हिरवी झेंडी*
  13 तालुक्यात फिरणार चित्ररथ
  पावसाळ्यात वीजेपासून होणाऱ्या हानी बाबत देणार माहिती

बी .पी.एस. लाईव्ह न्युज नेटवर्क                                            नागपूर:-जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. यावेळी नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ काळजी घ्यावी. वीजेचा कडकडाट असताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन, जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी केले. हा चित्ररथ जिल्ह्यातील 13 तालुक्यात फिरणार असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत नागरिकांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात वीजेपासून होणारी मनुष्य व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चित्ररथ तयार केला असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रीकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व  वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास, नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पद्धतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये, या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात असलेल्या सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे, शासकीय सूचनांचे पालन करणे आदी बाबत चित्ररथाद्वारे माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती असणारे जिल्हा माहिती कार्यालयाने साहित्यही चित्ररथामार्फत गावागावांमध्ये पोहोचविले आहे.