फुले बळीराजा डिजिटल कृषी सल्ला अॅप्लीकेशन शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांमधील दुवा - संशोधन संचालक डॉ . सुनील गोरंटीवार .

फुले बळीराजा डिजिटल कृषी सल्ला अॅप्लीकेशन शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांमधील दुवा - संशोधन संचालक डॉ . सुनील गोरंटीवार .

*फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला अॅप्लिकेशन शास्त्रज्ञ व शेतकर्यांमधील दुवा*

*- संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार*

*राहुरी विद्यापीठ, दि. 29 मे, 2023*

             फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला अॅप्लिकेशन हे पीक निहाय व वेळनिहाय शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे अॅप आहे. हे असे व्यासपीठ आहे की ज्याद्वारे त्यात नोंदणी केलेल्या शेतकर्याला त्याच्या कृषि विषयक प्रश्नांना शास्त्रज्ञांद्वारे व्यक्तीशः उत्तर दिले जाणार आहे. ज्या शेतकर्यांना विद्यापीठात येणे शक्य नाही किंवा संशोधन केंद्रे तसेच तालुक्यातील विस्तार यंत्रणेला भेटणे शक्य नाही त्या शेतकर्यांनी आपल्या पीकासंदर्भातील प्रश्न या अॅपवर टाकल्यानंतर त्यांना शास्त्रज्ञांद्वारे त्यावर उपाय लगेच ऑनलाईन सुचविला जाणार आहे. अशा प्रकारे फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला अॅप्लिकेशन शास्त्रज्ञ व शेतकर्यांमधील दुवा ठरणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जर्मन शासन, जी.आय.झेड., नाबार्ड, राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैद्राबाद व मफुकृवि, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने फुले बळीराजा या डिजिटल कृषि सल्ला ऍप्लिकेशनचा एक दिवसीय प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. यावेळी हैद्राबाद मॅनेजचे सहाय्यक संचालक डॉ. जी. भास्कर ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी प्रो-सॉईल प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, जी.आय.झेड.चे तांत्रिक मार्गदर्शक श्री. रणजीत जाधव उपस्थित होते.

            यावेळी डॉ. भास्कर मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतकर्यांना हवामानानुसार, पिकानुसार, वेळेनुसार पीक सल्ला देण्याकरीता या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींच्या कृषि विस्ताराची क्षमता वृध्दींगत होण्यासाठी मदत होणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून मॅनेज संस्था महात्मा फुले कृषि विद्यापीठाबरोबर फुले बळीराजा अॅप विकसीत करण्यासाठी काम करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. मुकुंद शिंदे म्हणाले की या एक दिवसाच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना फुले बळीराजा अॅप संदर्भात संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्याद्वारे त्यांच्या तालुक्यातील शेतकर्यांनी फुले बळीराजा अॅपची नोंदणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत 50 हजार पेक्षा जास्त शेतकर्यांनी या फुले बळीराजा अॅपच्या व्यासपीठावर नोंदणी केली आहे. या अॅपमुळे शेतकर्यांना नविन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत होणार आहे. 

            याप्रसंगी इंजि. रणजीत जाधव या प्रशिक्षणासंबंधी बोलतांना म्हणाले की शेतकर्यांना वेळेवर सल्ला मिळावा यासाठी जी.आय.झेड, नाबार्ड, मॅनेज आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ या फुले बळीराजा अॅपवर एकत्र काम करीत आहेत. याचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा. यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. हिमांशु वर्मा, श्री. गोकुळ कन्नन, श्री. सेलवामनी आणि श्री. विश्वंभर राणे यांनी फुले बळीराजा वेब आणि मोबाईल अॅप्लिकेशन, शास्त्रज्ञांची या अॅपवर नोंदणी व शेतकर्यांच्या प्रश्नांची उत्तरे इ. विषयांवर शास्त्रज्ञांना व विस्तार अधिकार्यांना प्रशिक्षण दिले. 

          या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन फुले बळीराजा सल्ला सेवेचे नोडल अधिकारी डॉ. अवधुत वाळुंज यांनी केले. जी.आय.झेड प्रो सॉईल प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले. याप्रसंगी कृषि सल्लागार समितीचे सल्लागार डॉ. रवि आंधळे, अॅपचे सामग्री निर्माते डॉ. विक्रम कड, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. विरेंद्र बारई, विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाचे, संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.