महात्मा फुले कृषी विद्यापीठात खरीप हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न, कमी मनुष्यबळातही विद्यापीठ व कृषि विभाग कार्यक्षमपणे कार्यरत - कुलगुरु डॉ . पी . जी . पाटील
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात खरीप हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न*
*कृषि विद्यापीठ व कृषि विभाग कमी मनुष्यबळातही शेतकर्यांसाठी कार्यक्षमपणे कार्यरत**- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 9 ऑगस्ट, 2024*
कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कर्मचारी तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकर्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अथकपणे प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाने यावर्षी 6 वाण, 89 कृषि तंत्रज्ञान शिफारशी व 5 सुधारित अवजारे प्रसारित केली आहे. विद्यापीठातील संशोधन कृषि विज्ञान केंद्रे, विविध विस्तार केंद्रे व कृषि विभागाच्या मदतीने शेतकर्यांपर्यंत पोहचविले जाते. विद्यापीठ व कृषि विभाग कमी मनुष्यबळातही शेतकर्यांसाठी कार्यक्षमपणे कार्यरत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप-2024 च्या बैठकीचे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक श्री. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पुणेचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रफिक नाईकवडी, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रविशंकर चलवदे, पदव्युत्तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खडबडे व सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले आपत्कालीन परिस्थितीकरीता विद्यापीठाने उपयुक्त अशा शिफारशी दिलेल्या आहेत. यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे 1846 क्विं. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले. सरकारने दिलेले बिजोत्पादनाचे लक्षांक विद्यापीठाने पुर्ण केले आहे. कृषि विभागानेसुध्दा बिजप्रक्रियेसारख्या योजना चांगल्या पध्दतीने राबविलेल्या आहेत. शेतकर्यांना शेती करतांना येणार्या अडचणी, विविध प्रश्न यावरुनही संशोधनाची दिशा ठरविता येते असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण उपक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. मुकुंद शिंदे यांनी सौर उर्जा संचलीत सिंचन प्रणाली या विषयावर सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री सुगी खरीप व इतर प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, कोल्हापूर व नाशिक कृषि विभागांचे कृषि सह-संचालक श्री. रफिक नाईकवाडी, श्री. संभाजी ठाकुर, श्री. कुंभार यांनी त्यांच्या विभागांचा अहवाल सादर केला. बैठकीदरम्यान डॉ. साताप्पा खरबडे यांनी फळमाशी व वांझ रोगावरील औषधे, डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे मानके, डॉ. विजू अमोलिक यांनी केळी व नाचणी पिकाविषयीचे प्रश्न, डॉ. बी.टी. पाटील यांनी केळी, ड्रगन फ्रुट, सफरचंद, स्ट्राबेरी व प्लॅस्टिक आच्छादन याविषयी, डॉ. विक्रम कड यांनी कांदा डीहायड्रेशन, हिरवी मिरची, नाचणी पिकांविषयीचे प्रश्न, डॉ. अशोक पिसाळ यांनी ऊस पिकाविषयीचे प्रश्न, डॉ. अनिल दुरगुडे यांनी सूक्ष्मअन्नद्रव्यांविषयी, डॉ. नरेंद्र काशीद भात पिकानंतर घ्यावयाची पिके, डॉ. तुळशीदास बास्टेवाड कृषि अवजारांविषयी, डॉ. सुनील कराड यांनी मका पिकाविषयी, डॉ. दिलीप देवकर जनावरांच्या खाद्याविषयी, डॉ. योगेश बन यांनी नाचणी पिकाविषयी, डॉ. कैलास भोईटे यांनी सुपरकेन नर्सरीविषयी, डॉ. नंदकुमार भुते यांनी कपाशीवरील बुरशीनाशकांची माहिती या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजय शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. या बैठकीस विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषि सह-संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उप-विभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने उपस्थित होते.