म.फु. कृ. विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या फ्लेक्स बोर्डने वेधले सर्वांचे लक्ष .

म.फु. कृ. विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या फ्लेक्स बोर्डने वेधले सर्वांचे लक्ष .

             दिनांक २९ मार्च २०२२ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ५४ वर्ष पूर्ण निमित्त स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम मा कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉक्टर चारुदत्त मायी, माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ नवी दिल्ली हे होते. परंतु हा स्थापना दिवस कार्यक्रम ज्या मोठ्या उत्साहात करण्यात आला याला राहुरी तालुक्यातून विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच सामान्य नागरिक यांच्यातून मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे .कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी स्थापन होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या २८४९ हेक्टर जमिनीचे विद्यापीठाकडे संपादित करण्यात आले व जवळपास ५८४ खातेदारांना आपल्या जमिनी विद्यापीठासाठी देऊन मोठा त्याग करावा लागला त्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे .   ही नाराजी व्यक्त करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज पर्यंत झालेला अन्याय फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून विद्यापीठाच्या  मेन गेट वर व्यक्त केला आहे .

      महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नावाजलेल्या विद्यापीठांपैकी एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे मानले जाते परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या विद्यापीठ शिक्षण संशोधन आणि विस्तार यासाठी दिल्यात त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर ५४ वर्षे होऊन देखील आज विद्यापीठ कडून मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, आज मोठ्या दिमाखात या विद्यापीठ स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले, परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठी विद्यापीठाकडून आजही टाळाटाळ होत आहे .पाहिजे त्याच जोमाने विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारे ठोस पाठपुरावा न झाल्यामुळे व शासन स्तरावर स्थानिक विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतक-यांची बाजू भक्कमपणे न मांडल्यामुळे आज १०० ते १५० प्रकल्पग्रस्त उमेदवारांवर विद्यापीठ सेवेत सामावून न घेतल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, आज रोजी विद्यापीठ मध्ये मंजूर पदांपैकी गट क व गट ड संवर्गातील सुमारे १३५० पदे रिक्त असून या प्रकल्पग्रस्तांची भरती विद्यापीठाकडून होत नाही .

          ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे विद्यापीठ स्थापन झाले, त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना डावलून आज हे विद्यापीठ बाहेरील लोकांना महत्वाचे स्थान देऊन विद्यापीठ चालवण्याचा जाणून बुजून प्रयत्न काही अधिकारी वर्गाकडून केला जात आहे, याकडे स्थानिक लोक प्रतिनिधी व राहुरी तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री तसेच पालकमंत्री मा प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने लक्ष घालून हा विषय कायमस्वरूपी संपून या विद्यापीठात सुरू असलेला सावळागोंधळ तात्काळ संपुष्टात आणून स्थानिक विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना न्याय देण्याची कार्यवाही व्हावी यासाठी उच्चस्तरीय बैठकिती निर्णय शासन स्तरावर घेऊन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, ही राहुरी तालुका विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने मागणी होत आहे, राहुरी तालुक्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे, आंदोलने होत आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी आमरण उपोषण केले तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिनांक १४ मार्च २०२२ रोजी अमरण उपोषण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी करून देखील अद्याप पर्यंत हा विषय सुटलेला नाही.

       

       प्रकल्पग्रस्त कृती समितीने महात्मा फुले कृषी विद्यापीठास दिलेल्या निवेदनामध्ये दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत ठोस निर्णय घेऊन हा विषय शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने सोडवावा असे लेखी पत्र दिले आहे . तसे न झाल्यास ४ एप्रिल २०२२ नंतर कोणत्याही क्षणी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी विद्यापीठ गेटवर आपल्या संपूर्ण कुटुंबा समवेत गाय गुरे घेऊन आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे . मा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी त्वरित हा विषय सोडवण्यासाठी गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ बैठक घेऊन या राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा अशा प्रतिक्रिया राहुरी तालुका विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.