गुंतवणुकीचे नियोजन जेवढे कष्टप्रद तेवढे निवृत्तीनंतरचे जीवन सुखी*
*गुंतवणुकीचे नियोजन जेवढे कष्टप्रद तेवढे निवृत्तीनंतरचे जीवन सुखी*
*- गुंतवणुक सल्लागार श्री. संतोष दळवी*
*राहुरी विद्यापीठ, दि. 7 सप्टेंबर, 2023*
नोकरी करत असतांना योग्य वेळी व योग्य ठिकाणी गुंतवणुक केल्यास भविष्यकाळात आपण आनंदी जीवन जगु शकतो. त्याकरीता आपल्याला गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणारा योग्य गुंतवणुक सल्लागार भेटायला हवा. तुमचे गुंतवणुकीचे नियोजन जेवढे कष्टाचे राहिल तेवढे तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी राहिल असे प्रतिपादन मुंबई येथील गुंतवणुक सल्लागार श्री. संतोष दळवी यांनी केले.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने महिन्यातून दोन वेळा तज्ञ व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभुमीवर या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्या जलसिंचन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने यांनी केले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट-कासम प्रकल्प) यांच्या सहकार्याने गुंतवणुकीचे योग्य नियोजन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात करण्यात आले होते. यावेळी गुंतवणुक सल्लागार श्री. संतोष दळवी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे नियंत्रक श्री. सदाशीव पाटील होते. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्या जलसिंचन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, प्रसारण अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.
श्री. संतोष दळवी आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की गृह कर्ज व्यवस्थापन योग्य पध्दतीने करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने टर्म विमा, मेडीक्लेम पॉलिसी याबरोबरच अपघाती विमा घेतला पाहिजे. आपल्याला दरवर्षी मिळणारा 16 नं फार्म व्यवस्थित वाचायला हवा. एन.पी.एस. सारख्या योजनेमध्ये गुंतवणुक करुन करामध्ये सवलत मिळविता येते. फिक्स डिपॉझीटपेक्षा म्युच्युअल फंड अधिक काळ नियमीत परतावा देणारे असून वर्षातून दोनवेळा रिलीज होणारे सोव्हेनिअर गोल्ड बाँड फायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. सदाशीव पाटील म्हणाले योग्य गुंतवणुक आपल्या कठीण काळात आपल्याला साथ देते. आपल्या उतार वयात फायदेशीर ठरतील असे गुंतवणुकीचे पर्याय आपण वापरले पाहिजेत. वर्षभराचा खर्च, आयकर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन व्यवस्थीत करणे फादयेशीर ठरु शकते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. महाडकर यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. देविदास खेडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गुंतवणुक सल्लागार श्री. अविनाश साबरे तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.