गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारताचा आवाज हरपला. भारताची कोकिळा भारतीयांना सोडून गेली. संगीत क्षेत्रातील एका पर्वाचा शेवट, लतादीदींना तळागाळातून श्रद्धांजली. प्रत्येकाच्या मनातील मनातल्या प्रत्येक धाग्याची जुळलेले नाव म्हणजे फक्त लता मंगेशकर.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. राजकीय सामाजिक त्याचप्रमाणे विदेशातूनही लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
भारतातील जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या भारतीय व्यक्ती कोण? असा प्रश्न जर कुणी विचारला, तर ज्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती होत्या, त्यात भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आपण सगळे त्यांना लता दीदी या लाडक्या नावानं ओळखतो. आपल्या सुरेल गळ्यातून अक्षरश: हजारो हिंदी-मराठी गाणी गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. गेली सहा दशकं, म्हणजे रसिकांच्या तीन पिढय़ा त्यांची सुमधुर हिंदी-मराठी चित्रपट गीतं ऐकत मोठय़ा झाल्या.
गेल्या सहा दशकांत त्यांनी ९८०पेक्षाही अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. याशिवाय इतर वीस प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या २५ हजारांपेक्षाही जास्त असावी.
लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. फार कमी लोकांना माहीत असेल की, त्यांचं पाळण्यातलं नाव `हृदया' होतं. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे त्या काळातील मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध गायक-नट होते. मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. लता दीदींच्या आईचे नाव शुद्धमती त्यांना सर्व जण माई या नावाने संबोधत असत. लता दीदी हे दिनानाथांचे सर्वांत ज्येष्ठ अपत्य. दिनानाथ आणि माईंना लता, आशा, उषा, मीना या चार कन्या आणि हृदयनाथ हा मुलगा अशी पाच अपत्ये झाली. पुढे दिनानाथांप्रमाणेच या सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळविला.
लता दीदींना अर्थातच पहिले गुरू लाभले ते म्हणजे खुद्द त्यांचे वडील पंडित दिनानाथ. त्यामुळे केवळ वयाच्या पाचव्या वर्षापासून दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांत बाल-कलाकार म्हणून कामं करण्यास सुरुवात केली.
लता दीदी अवघ्या तेरा वर्षांच्या असताना, म्हणजे १९४२ साली पंडित दिनानाथांचं हृदयविकाराने निधन झालं. घरची परिस्थिती हलाखीची होती. माई आणि आपली चार भावंडं यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी दीदींवर येऊन पडली. अशा कठीण काळात प्रसिद्ध नट-दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. त्यांनी दीदींना मराठी चित्रपटांत गाण्याची आणि अभिनयाची संधी दिली. वसंत जोगळेकरांच्या `किती हसाल' या १९४२ सालच्या चित्रपटातले `नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वर्षी दीदींनी भूमिका केलेला `पहिली मंगळागौर' हा चित्रपटही प्रसिद्ध झाला. याही चित्रपटांनी त्यांनी दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं एक गीत गायलं होते. १९४५ साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली. उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. इथेच त्यांचा हिंदी चित्रपटात प्रवेश झाला. वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या `आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या `पा लागू कर जोरी' हे पहिले गीत दीदींनी गायले.
एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदींना नंतरची तालीम मिळाली.
लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणं आणि आपली जागा निर्माण करणं तेवढं सोपं नव्हतं. त्या काळात हिंदी संगीतात नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली यांच्यासारख्या गायिकांच्या अनुनासिक आणि जड आवाजाची मोहिनी भारतीयांवर पडली होती. त्यामुळे त्या काळातील प्रथितयश निर्मात्यांना दीदींचा आवाज अतिशय `बारीक' वाटला. काहींनी तो नाकारलासुद्धा. पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांना दीदींच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. जनाब हैदर साहेबांनी हा पुढच्या काळातला शाश्वत आवाज आहे, हे तेव्हाच ओळखले होते. त्यांनीच दीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात `दिल मेरा तोडा' हे गीत गाण्याची संधी दिली.
सुरुवातीला दीदी त्या काळातील नूरजहाँसारख्या गायिकांच्या आवाजाचे अनुकरण करीत असत. पण कालांतराने दीदींनी स्वत:ची अशी खास शैली निर्माण केली. लता दीदींनी आपले उर्दू उच्चार सुधारावेत म्हणून अपार कष्ट घेतले. त्यासाठी शफी नावाच्या मौलवींकडून त्यांनी उर्दू उच्चारांचे रीतसर धडे गिरवले.
लता दीदींचे खूप गाजलेले पहिले गाणे म्हणजे १९४९ सालच्या `महल' या चित्रपटातले खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले `आयेगा आयेगा आनेवाला' हे गीत. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गीतानंतर दीदींनी मागे वळून पाहिले नाही.
१९५०नंतर लता दीदींचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला. त्या काळातील अनिल विश्वास, नौषाद, सज्जाद हुसेन, वसंत देसाई, हंसराज बहल, वसंत देसाई यांच्यासारखे जुने आणि त्या काळात उदयाला येणारे एस. डी. बर्मन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदन मोहन, उषा खन्ना, रवी, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन अशा सगळ्याच संगीतकारांकडे दीदी गाऊ लागल्या. या सगळ्यांकडे गायलेल्या दीदींच्या गाण्यांना अमाप लोकप्रियता मिळत गेली. ओ. पी. नय्यर यांचा सन्माननीय अपवाद वगळता त्या काळातील जवळजवळ प्रत्येक संगीतकाराकडे दीदी गात होत्या.
त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकारांकडे लता दीदींनी गायलेल्या प्रसिद्ध गाण्यांची यादी करायची म्हटलं तर अवघड आहे हे जास्त चांगलं की ते, हे जास्त मधुर की ते, हे जास्त लोकप्रिय की ते असा संभ्रम पडावा अशी शेकडो गाणी दीदींनी त्या काळातील जवळजवळ प्रत्येक प्रथितयश संगीतकाराकडे गायली आहेत.
संगीतकार सलील चौधरी यांनी `मधुमती' या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या `आजा रे परदेसी' या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्यानंतर सतत दहा वर्ष त्यांना हे पारितोषिक मिळत राहिले. नंतर मात्र दुसर्या गायिकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:हून पारितोषिक घेण्याचे थांबविले.
१९६२ साली चीनने भारतावर अनपेक्षितपणे आक्रमण केले. त्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ साली दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक खास गीत कवी प्रदीप यांनी लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. ते गीत लता दीदी यांनी गायले. तेच आजही अमाप लोकप्रिय असलेले गीत म्हणजे `ऐ मेरे वतन के लोगो'. हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
मराठीतही दीदींनी असंख्य गाणी गायली आहेत. चित्रपट गीतांबरोबरच मराठीतील भावगीते त्यांनी गायली. `आनंदघन' या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी काही मराठी (वादळ) आणि हिंदी (झांजर, कांचन, लेकीन) अशा चित्रपटांची निर्मितीही केली.
दीदींना अत्तरे आणि हिर्यांची चांगली पारख आहे. त्यांना छायाचित्रे काढायला खूप आवडते, तसेच क्रिकेटची मॅच बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
लता दीदींना अक्षरश: असंख्य पुरस्कार मिळाले. इतर महत्त्वाच्या पुरस्कारांबरोबरच १९६९ साली पद्मभूषण आणि १९९९ साली पद्मविभूषण ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. दरम्यान चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारा `दादासाहेब फाळके' हा सर्वोच्च सन्मान १९८९ त्यांना प्रदान करण्यात आला. एवढेच नव्हे, तर भारतातील सर्वोच्च समजला जाणारा `भारतरत्न' हा किताब त्यांना २००१ साली प्रदान करण्यात आला.
लतादीदींच्या निधनाने संपूर्ण भारतात शोक पसरला आहे. भारतीय पत्रकार संघटन यांच्याकडून लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.