फुले अमृतकाळ तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲपचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न .

फुले अमृतकाळ तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲपचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न .

*फुले अमृतकाळ तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशू सल्ला अँपचे उदघाटन* 

 

*राहुरी विद्यापीठ,दि. 7 मार्च, 2024*

 

       महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 'देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे' "फुले अमृतकाळ - तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲप" चे उद्घाटन मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे कृषी मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, आमदार मा. श्री. संग्राम जगताप, आमदार मा. श्री. बाळासाहेब आसबे, राज्याचे अपर कृषी सचिव श्री. अनूप कुमार तसेच कृषी आयुक्त श्री. प्रविण गेडाम हे उपस्थित होते.  

 

            या ॲप द्वारे विविध ऋतूतील, विशेषतः उन्हाळ्यातील, जास्त तापमानाचा गाई आणि म्हशी वर येणारा ताण आपल्याला समजणार आहे. ओपन सोर्स माहितीच्या आधारे व सेन्सर्स च्या मदतीने या ॲप ने आपण जगभरातील कुठल्याही स्थळाचे तापमान आद्रता निर्देशांक (THI) याची माहिती मिळवून जास्त किंवा कमी तापमान निर्देशांक असल्यास जनावरांची घ्यावयाची काळजी व सल्ला लगेचच मिळणार आहे. बदलत्या वातावरणामुळे जनावरांवरील येणारा ताण व त्यामुळे कमी होणारे दूध उत्पादन या ॲप द्वारे दिले गेलेले सल्ले वेळीच अमलात आणून रोखता येईल.

 

               या वेळी बोलताना कृषी मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे म्हणाले की सदर ॲप हे बदलत्या वातावरणात सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी असून, जनावरांना होणाऱ्या उष्माघातामुळे दूध उत्पादनात होणारी मोठी घट या ॲपच्या वापरा मुळे कमी होण्यास मदत होईल. तसेच विद्यापीठाने देखील सदर अद्ययावत अँप शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होऊन नियमित वापरता येण्यासाठी सर्वत्र पोहचविण्याची तयारी करावी असेही नमूद केले. वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. संकरित गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल. देशी गाय संशोधन केंद्राचे गो संवर्धनाचे कार्य प्रशंसनीय असल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. विद्यापीठाने तयार केलेले अँप हे पशुपालकांसाठी अत्यंत उपयोगी असल्याचे नमूद करून त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.उद्घाटनानिमित या विषयावर आधारित तयार केलेली छोटी चित्रफित तसेच तसेच फुले अमृतकाळ ॲपच्या लोगोचे देखील अनावरण करण्यात आले. 

 

              यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या उपयोगी पडत असून उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे असे नमूद केले. कृषी सचिव श्री. अनूप कुमार म्हणाले की सदर अँपचा उपयोग विदर्भ आणि मराठवाडा अश्या उष्ण भागात पशूपालकासाठी चांगला होवू शकतो. याप्रसंगी अँपचे तांत्रिक सादरीकरण डॉ सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले. 

 

              याप्रसंगी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. सुनील मासळकर, प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ.धीरज कंखरे, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ संतोष मोरे, तंत्रज्ञ श्री. अभयसिंह जगताप व श्री. श्रीकृष्ण मुळे आदी उपस्थित होते.