*आता उन्हाळा आलाय... तर उसाचा रसच प्यायचा - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे आवाहन* *राहुरी विद्यापीठ, दि. 24 मार्च, 2022*
*राहुरी विद्यापीठ, दि. 24 मार्च, 2022*
जाहिरातीमध्ये चित्रपटसृष्टीतील काही नामवंत प्रतिष्ठित कलाकार 20-25 रुपयांच्या शीतपेयाच्या बाटलीसाठी मोठमोठ्या डोंगरावरुन, हेलीकॉप्टरमधून उड्या मारतांना दिसतात. आपण मात्र रस्त्याच्या कडेला जागोजागी उभ्या असणार्या रसवंतीवर जावून थंडगार, स्वच्छ, आरोग्यवर्धक असा उसाचा ताजा रसच प्यायचा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
उन्हाळा आला की उन्हाचा चटका वाढतो. मग आपसूकच आपली पावले उसाच्या रसवंतीकडे वळतात. उन्हाळ्यातील वातावरणात उसाच्या ताज्या रसाचा आस्वाद घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. आयुर्वेदामध्ये उसाच्या रसाला फार मोठे महत्व आहे. उसाचा रस खोकला, दमा, मुत्राशयाचे रोग व किडनीसंबंधीत रोगावर गुणकारी आहे. उसाच्या रसाच्या सेवनामुळे त्वचा उत्तम व निरोगी राहते. डीहायड्रेशनपासून बचाव होऊन तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते. शरीरासाठी उर्जेचा उत्तम स्त्रोत तसेच कावीळ रोगावर अत्यंत गुणकारी असल्याचे संदर्भ आयुर्वेदात सापडतात. याचबरोबर उसाचा रस सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त असून कृत्रीम पेय आणि कार्बोनेटेड शीतपेयांना एक चांगला पर्याय आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या माध्यमातून विकसीत केलेले लोकल पुंड्या, को-419, को-11063, को-86032, कोएम-0265, एम.एस.-10001 व को-99004 (दामोदर) हे व अगदी अलीकडे पूर्वप्रसारीत केलेला एम.एस.-15012 या वाणांचा वापर रसवंती उद्योगासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर होतांना दिसून येतो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पुण्याच्या कृषि महाविद्यालयात सन 1972 पासून रसवंतीचा उद्योग सुरु केला आहे. रसवंतीसाठी योग्य ऊस वाणांच्या चाचण्याही घेतल्या असून यामध्ये पूर्वी पुंड्या, को-419 व 11063 या ऊस वाणांचा रसवंतीसाठी वापर केला जात होता. सध्या एम.एस.-10001 हे ऊस वाण हिरवागार, मधुर तसेच जाड व मऊ असल्याने खाण्यासाठी व रसवंतीसाठी ग्राहकांच्या पसंतीस पडलेले आहे. सध्या उसाच्या रसामध्ये स्ट्रॉबेरी, संत्रा, अननस, लिंबू व आले अशा फळांचे ज्यूस मिसळून विविध फ्लेवरमध्ये रसनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे चवीच्या बाबतीत चोखंदळ असलेल्या पुण्यासारख्या शहरामध्ये कृषि महाविद्यालयातील रसवंतीची वेगळी ओळख झालेली आहे.
रसवंती उद्योग सुरु करण्यासाठी खुपच कमी भांडवल लागते. अत्यंत कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळविता येतो. सध्याच्या तापमान वाढीच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी लोकांना ताजा व दर्जेदार उसाचा रस उपलब्ध होण्यासाठी जागोजागी रसवंतीगृह सुरु करणे ही काळाची गरज आहे. या व्यवसायामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उसाला रास्त दर मिळून त्यांना आर्थिक फायदा होईल. रसवंती उद्योग हा तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि रसवंती उद्योगालाही लोकमान्यता व राजमान्यता मिळेल असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आ
हे.