*जिल्ह्यात सततधार पाऊस: गरज नसताना घराबाहेर पडु नका*
*जिल्ह्यात सततधार पाऊस ; गरज नसताना घराबाहेर पडू नका* बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज दिल्ली नागपूर:-प्र.प. क्र.५७९ दि.१३जुलै२०२३ रोजी - जिल्हाधिकारी • उपमुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा • नागपूर जिल्ह्यात 24 तासात 10 जण वाहून गेलेत • जिल्हा प्रशासन ‘हाय अलर्ट’ वर ; पावसाचा ऑरेंज अलर्ट • नदी ओलांडण्याची घाई न करण्याचे आवाहन • पाऊस थांबताच सर्वेक्षणाला सुरुवात करणार • गरजेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश • जिल्ह्यातील एकूण 18 धरणांमधून विसर्ग सुरू • नवेगाव खैरी, वडगाव, नांदा या धरणांची दारे उघडली • सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. 18 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या 24 तासात दहा जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. नांद धरण, रामा धरण या ठिकाणच्या विसर्गाची प्रत्यक्ष पाहणी
केली व अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती घेतली. काल झालेल्या नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना देण्याबाबत त्यांनी आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात पुढील काही तास पाऊस येण्याची शक्यता असून सर्व यंत्रणांनी सतर्क असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 91.90 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 12 जुलै पर्यंत जवळपास 357 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 मध्यम धरणे 65 टक्के भरले आहे. यापैकी तीन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे काल सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथे पुलावरून पाणी वाहत असताना स्कार्पिओ वाहन पुरात टाकल्यामुळे सहा जणांचा वाहून जात मृत्यू झाला. सावनेर तालुक्यातीलच पटाका खेरी नाला या ठिकाणी एक जण वाहून गेला. नागपूर शहरानजीकच्या मानकापूर येथील साईनगर नाल्यांमध्ये 33 वर्षीय योगेश राऊत हे वाहून गेले. याशिवाय काटोल तालुक्यातील इसापूर येथील चिखली तलावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील मौजा पेठ बुधवार या ठिकाणी दत्तू मधुकर राजूरकर या 39 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त आहे. 24 तासात दहा लोकांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पुढील तीन दिवस आणखी मुसळधार
पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून यावेळी घराबाहेर न पडणे सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे एक जून पासून 13 जुलै पर्यंत विविध घटनेत २० जण मृत्युमुखी पडले आहेत. 19 जण जखमी झाले आहेत 88 पशु देखील मृत्युमुखी पडले असून 293 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या महिन्याभरात २ हजार 399 हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून तातडीने मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे. ज्या गावांना पुराचा तडाका बसला आहे त्या ठिकाणी नागरिकांना गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंश प्रतिबंधात्मक औषधाची उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीने तालुका आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा परिस्थितीत मदत मागण्यासाठी तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाने 24 तास संपर्क व्यवस्था सुरू ठेवली आहे. तालुक्यांचे संपर्क क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर -०७१२-२५६२६६८, तहसील कार्यालय नागपूर शहर -०७१२-२५६१९७५, तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण -०७१२-२५६४५७७, तहसील कार्यालय कामठी -०७१०९-२८८२२० तहसील कार्यालय हिंगणा -०७१०४-२९९५३४ तहसील कार्यालय काटोल -०७११२-२२२०२३, तहसील कार्यालय नरखेड -०७१०५-२३२२०६ तहसील कार्यालय सावनेर -०७११३-२३२२१२, तहसील कार्यालय कळमेश्वर -०७११८-२७१३५८, तहसील कार्यालय रामटेक -०७११४-२५५१२४ तहसील कार्यालय मौदा -०७११५-२८११२८ तहसील कार्यालय पारशिवनी -०७१०२-२२५१३९ तहसील कार्यालय उमरेड -०७११६-२४२००४ तहसील कार्यालय भिवापूर -०७१०६-२३२२४१ तहसील कार्यालय कुही -०७१००-२२२२३६ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.