जागतिक जल दिनानिमित्त प्रत्येकाने जल संवर्धनाची कास धरावी - संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के

*जागतिक जल दिनानिमित्त प्रत्येकाने जल संवर्धनाची कास धरावी*
*- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के*
सिंचनाचे पाणी हे कोरडवाहू विभागात तारक व बागायत क्षेत्रात अतिरिक्त वापराणे मारक होऊ शकते त्यासाठी पाण्याचे काटकसरीने नवीन आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर केल्यास जामिनी क्षारपड होणार नाही व विविध पिकांचे शाश्वत उत्पादन घेता येईल. जागतिक जल दिनानिमित्ताने प्रत्येकाने जल संवर्धनाची कास धरावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पाने जागतिक जल दिनानिमित्ताने अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व कृषि साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मु.पो. गुंजाळे ता. राहुरी या गावामध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके होते. यावेळी गुंजाळे गावचे सरपंच सौ. सीमा नवले, कार्यक्रमाचे आयोजक वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे व जलसिंचन निचरा अभियांत्रिकीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पोपळे उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात करतांना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की आपण सिंचनासाठी पाणी वापरतांना त्याचा ताळेबंद ठेवणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी पाण्याची बचत करण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक, तुषार, रेन पाईप, या सुक्ष्मसिंचन पध्दतींचा वापर करावा. पाणी वाचविणे म्हणजेच पाणी कमविणे. डॉ. अनिल दुरगुडे यांनी जागतिक जल दिनानिमित्ताने हिमनद्याच्या संवर्धनाबाबत माहिती सांगितली व पाण्याचे पृष्ठभागावरील व पृष्ठभागाखालील पाण्याच्या संवर्धना विषयी व नैसर्गिक भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थितांना जल संवर्धन करण्याची शपथ देण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शेतकर्यांना कृषिदर्शनी, आधुनिक सिंचन पध्दतींचे साहित्य, सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार दिपक नवले यांनी मानले.