श्रीरामपूर - आदिवासी समाजाच्या विकासासाठी राजूर प्रमाणे श्रीरामपूर येथे आदिवासी एकात्मिक विकास उपप्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर - आदिवासी समाजाच्या विकासासाठी राजूर प्रमाणे श्रीरामपूर येथे आदिवासी एकात्मिक विकास उपप्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आश्रमशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - आ. कानडे

             आदिवासी एल्गार महासभेस प्रचंड प्रतिसाद

 

श्रीरामपूर-पुणतांबे रस्त्यावरील गोंधवणी येथील डावखर मंगल कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या आदिवासी एल्गार महासभेच्या अध्यक्षपदावरून आ. कानडे बोलत होते. श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, दीपक निंबाळकर, सुदाम पटारे, युनूस पटेल, दीपक कदम, चांगदेव देवराय, बापूसाहेब लबडे, सुनील शिंदे, इमरान शेख, शिवाजी अभंग, सुनील शिंदे, आशिष शिंदे, प्रतीक कांबळे, कल्पेश माने, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक शिवाजी गांगुर्डे, संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर लगड, मल्हारी पवार, दत्ता माळी, विष्णू वाघ, रंगनाथ आहेर, सुदाम मोरे, सुभाष पवार, भीम आर्मीचे दीपक भालेराव, योगेश पवार, भारत पवार, मच्छिंद्र जाधव, ताराबाई पवार, अंजली पवार, सरपंच नंदा अहिरे यावेळी व्यासपीठावर होते.

             प्रारंभी दीप प्रज्वलन व विविध महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच जय जय महाराष्ट्र माझा या गीताने एल्गार महासभेस सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अधिवेशनामध्ये पारधी विकास आराखड्याप्रमाणे भिल्ल विकास आराखडा मंजूर करावा, या विषयावर आवाज उठवून त्यास मान्यता देण्याची मागणी केल्याबद्दल आ. कानडे यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. गोदावरी नदीत बुडणाऱ्या तिघांना आपल्या साडीच्या साह्याने वाचविणाऱ्या कोपरगाव येथील ताराबाई पवार यांचा यावेळी आ. कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

              आ. कानडे म्हणाले, आपण शोषित समाजाच्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता असून या समाजाचे दुःख जाणून आहे, त्यामुळे आपण कायमच आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, यापुढेही ते काम सुरूच राहील, शासकीय जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या आदिवासींचे अतिक्रमणे नियमानुकूल करावीत, असा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. या प्रश्नासाठी आपली लढाई सुरू आहे. अशी अतिक्रमणे उठविण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दांडा काढावा, मी तुमच्या पाठीशी राहील. जातीचे दाखले, रेशन कार्ड असे आदिवासींचे प्रश्न आहेत. त्याचे ऑनलाईन अर्ज भरून द्यावेत, कोणी दाखल्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत काळजी घेऊ.

             गोरगरिबांच्या नावाने मते मागणाऱ्यांनी गोरगरिबांसाठी झालेले निर्णय अमलात आणले पाहिजेत. परंतु तसे होत नाही. सरकारने आदिवासींसाठी जे प्रकल्प केले तेथे सर्व निधी दिला जातो. राजुर येथे आदिवासी प्रकल्प असून त्यांना 85 टक्के निधी मिळतो तर इतरत्र आदिवासींची संख्या जास्त असताना त्यांना मात्र 15 टक्के निधी मिळतो. सर्व आदिवासींना सामान नीधीचे वाटप व्हावे, असा आग्रह आपण शासनाकडे धरला, पारधी विकास आराखड्याप्रमाणे आदिवासी विकास आराखडा मंजूर करावा, यासाठी आपण विधानमंडळात प्रश्न उपस्थित करून आवाज उठविला, पुढील काळात यासाठी लढा उभारावा लागेल, असे ते म्हणाले.

             आदिवासींसाठी असलेल्या राजुर येथील प्रकल्प जिल्ह्यातील इतर आदिवासींच्या दृष्टीने गैरसोईचा आहे. या कार्यालयात जाण्या-येण्यास पैसा व वेळ खर्च होतो. त्यामुळे श्रीरामपूर येथे उपप्रकल्प कार्यालय सुरू करावे, अशी आपली मागणी आहे. तसेच राजुर प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यातील काही आश्रम शाळा बंद असून त्यांचे लेखाशीर्ष मात्र बंद झालेले नाही. त्यामुळे त्यापैकी श्रीरामपूर व देवळाली प्रवरा येथे आश्रम शाळा सुरू कराव्यात, यासाठी आपन शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

              आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आ. कानडे यांचा नेहमी प्रयत्न असतो. आदिवासी विकास आराखड्याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणारे आ. कानडे पहिले आमदार आहेत. हा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील आदिवासी एकवटले असून सर्व आदिवासी आ. कानडे यांच्या पाठीशी उभे आहेत. आगामी निवडणुकीत आ. कानडे यांना विजयी करण्यासाठी आदिवासी निश्चितच प्रयत्न करतील, असे संघटनेचे संस्थापक शिवाजी गांगुर्डे यावेळी म्हणाले.

             राज्यात अनेक आदिवासी समाजाचे नेते असून यापैकी कोणीही आदिवासींच्या प्रश्नाबाबत अधिवेशनात बोलले नाहीत. मात्र आ. कानडे यांनी भिल्ल विकास आराखड्यावर अधिवेशनात चर्चा घडवून आणली. त्यांना आदिवासीच्या प्रश्नाची जाण असून आदिवासी वस्तीतील मूलभूत गरजा भागवायचे असतील तर आ. कानडे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर लगड यांनी यावेळी केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्हारी पवार, दत्ता माळी, सुदाम मोरे, दीपक भालेराव यांनी आपल्या भाषणातून आ. कानडे यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.

            रंगनाथ आहेर व हर्षदा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पाटील नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षनीय होती. मंगल कार्यालय गर्दीने भरले होते. त्यामुळे बाहेरही अनेक आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या.