
अहमदनगर (प्रतिनिधी)- एसबीआय लाइफ इन्शुरन्सने कोरोना काळात (ऑनलाईन) रीतसर दिलेल्या कोरोना रक्षक पॉलिसीचा परतावा देण्याच्या ऐनवेळी चुकीच्या पद्धतीने पॉलिसीला अवैद्य ठरवल्याने कायदेशीर कारवाई करून पॉलिसीचा परतावा देण्यात यावे या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या शाखा अभियंता अभिजीत गारगर यांना देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शारदा हिवसे, संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मिसाळ आदी. सारसनगर येथील शारदा संजय हिवसे यांनी एसबीआय लाइफ इन्शुरन्सची कोरोना रक्षक पॉलिसी (ऑनलाइन) ११ डिसेंबर २०२१ मध्ये घेतली होती. त्यानंतर कंपनीने पॉलिसी त्यांच्या घरी पोस्टाने पाठवून दिली. शारदा संजय हिवसे यांना ४ महिन्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना बुध हॉस्पिटल येथे ७ दिवस ऍडमिट केले होते. परंतु बुथ हॉस्पिटल येथे एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या कॅशलेस लिस्ट मध्ये नसल्याने त्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून एसबीआय लाइफ इन्शुरन्स सावेडी कार्यालयामध्ये फाईल जमा केली. अनेक दिवस होऊन देखील रक्कम जमा न झाल्याने त्याबाबतीत विचारणा करण्यासाठी एसबीआय लाइफ इन्शुरन्स च्या कार्यालयात गेल्या असता तेथील व्यवस्थापकांनी तुमची पॉलिसीच अवैध्य आहे, असे सांगितले .त्यांनी अधिक विचारणा केली असता तेथील शाखा अधिकारी यांनी तुमच्या पॉलिसीचे पेमेंट हे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून आल्याने पॉलिसी अवैध ठरवले असे त्यांना सांगितले. परंतु तुमच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून पेमेंट करू नये अशी कुठल्याही प्रकारची अट त्यांनी टाकलेली नव्हती,हे सर्व त्यांनी पॉलिसी देण्यापूर्वीच कळविले असते तर शारदा हिवसे यांनी इतर दुसऱ्या कंपनीची कोरोना रक्षक पॉलिसी घेऊन स्वतःला व कुटुंबाला कोरोना काळात विमा संरक्षण घेतले असते. कंपनीने त्यांची रीतसर रक्कम स्वीकारून त्यांना कोरोना रक्षक ही पॉलिसी दिलेली आहे केवळ सामान्य लोकांना फसवण्याच्या दृष्टीने कंपनीने पैसा गोळा केल्याचे यातून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॉलिसीचा परतावा देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.