देशी गाईंच्या उच्च वंशावळीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आय. व्ही. एफ .तंत्रज्ञान प्रचलित करणे गरजेचे -संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार.

*देशी गायींच्या उच्च वंशावळीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञान प्रचलीत करणे गरजेचे*
*- संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 2 जून, 2023*
भारतीय संस्कृतीमध्ये देशी गायींना महत्व असून सेंद्रिय शेतीकरीता आवश्यक असणार्या निविष्ठा देशी गायींपासूनच तयार करता येतात. यासाठी देशी गायींचे संवर्धन होणे आवश्यक असून देशी गायींच्या उच्च वंशावळीचे जलदगतीने जतन व संवर्धन करण्यासाठी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रचलीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मार्गदर्शन करतांना डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. त्या अंतर्गत देशी गायींचे जतन व संवर्धन त्याबरोबरच गो पालकांसाठी शास्त्रोक्त पध्दतीने संगोपनासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. सोमनाथ माने व त्यांचे सहकारी राबवित आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये संकरीत गायीचा सरोगेट मदर म्हणुन वापर करुन आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाने उच्च वंशावळीच्या देशी गीर जातीच्या सात दिवसाच्या भ्रुणाचे प्रत्यारोपन करण्यात आले. त्यापासून तयार झालेल्या कालवडीने दि. 26 मे, 2023 रोजी जन्म घेतला. या दिवशी योगायोगाने संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीचा समारोप समारंभ असल्याने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या सुचनेनुसार व चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एक मताने या कालवडीचे नांव संयुक्ता असे ठेवण्यात आले. सदरची सरोगेट गाय व संयुक्ता कालवडीच्या तब्येतीची पाहणी करण्याकरीता विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रकल्पाला भेट देवून कालवडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत 9 देशी कालवडी जन्माला आलेल्या असून शेतकर्याकडील 23 सरोगेट मदर यांच्यामध्ये (संकरीत गाय) या तंत्रज्ञानाने देशी गोवंशाची गर्भधारणा झालेली आहे व मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांच्या गोठ्यात या तंत्रज्ञानाने उच्च वंशावळीच्या देशी कालवडी निर्माण करण्याचे काम चालु आहे असे आय.व्ही.एफ./भ्रुण प्रत्यारोपनाचे समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले. याप्रसंगी सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, देशी गाय संशोधन केंद्रांर्तगत आय.व्ही.एफ./भ्रुण प्रत्यारोपन समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, संशोधन उपसंचालक डॉ. बी.डी. पाटील, डॉ. रविंद्र निमसे व कर्मचारी उपस्थित होते.