महात्मा फुले कृषी विद्यापीठ आयोजित उद्योन्मुख उद्योजक,प्रवास आणि अनुभव कार्यशाळेचे तांत्रिक सत्र संपन्न.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आयोजित उद्योन्मुख उद्योजक,प्रवास आणि अनुभव  कार्यशाळेचे तांत्रिक सत्र संपन्न.

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजीत उद्योन्मुख उद्योजक ः प्रवास आणि अनुभव कार्यशाळेचे तांत्रिक सत्र संपन्न*

*राहुरी विद्यापीठ, दि. 31 ऑगस्ट, 2023*

                     महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उद्योन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव तथा महासंचालक डॉ. हिमांशू पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. श्री. विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील, भा.कृ.अ.प.च्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.के. पाल उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये तीन तांत्रिक सत्र घेण्यात आले.

               पहिल्या तांत्रिक सत्राचा विषय उद्योन्मुख उद्योजक ः प्रवास आणि अनुभव या विषयावर पुणे येथील रिव्हिलस इरिगेशन इंडिया प्रा.लि.च्या उद्योग संचालिका डॉ. संगिता लड्डा यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या बदलत्या हवामान आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसाठी वीज पुरवठा अनियमित होतो. यामुळे शेतकर्यांची उर्जा शेतात जावून मोटार चालू बंद करण्यामध्ये खर्च होते. त्याचबरोबर पाण्याची उत्पादकता वाढवायची असेल तर फक्त सूक्ष्मसिंचनाकडे जावून उपयोग नाही. शेतीच्या सिंचनाला जर डिजीटल तंत्रज्ञानाची जोड दिली जसे की ऑटोमेशन, रिमोट सेंसिंग यामुळे आपण शेतीला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवू शकतो. यासाठी रिव्हिलस इरिगेशनने मना इरिगेशन तंत्रज्ञान विकसीत केलेले असून ते सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकर्यांना या तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या शेतीतील अद्ययावत माहिती मिळु शकते. सिंचनामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पेप्सीको आणि मकॉन कंपनीने बटाट्याच्या उत्पादनात 40 ते 45 टक्के वाढ केली आहे. नविन येणार्या स्टार्टअपला कृषि विद्यापीठाकडून अद्ययावत प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाल्या. 

              दुसर्या तांत्रिक सत्राचा विषय विद्यार्थी आणि प्राध्यापक ः डिजीटल शेतीमध्ये संशोधन आणि शिक्षण या विषयावर पुणे येथील कृषि उद्योग सल्लागार श्री. भारत भोजणे यांनी मार्गदर्शन केले. शेती करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून ही सोपी आणि अधिक उत्पन्न देणारी करायची असेल तर शेतीमध्ये डिजीटालायझेशन करणे गरजेचे आहे. डिजीटल शेती मुख्यत्वे करुन वनस्पती, पाणी, माती, मातीतील होणार्या सूक्ष्म हालचाली, हवामानातील विविध प्रकारची माहिती गोळा करण्यावर भर देते आणि त्यानंतर उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर निर्णय घ्यायला मदत करते आणि उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी केली जाते. ड्रोनद्वारे पिकाच्या फवारणीवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. यामध्ये ड्रोनची गती, पिकापासून किती उंचीवर ड्रोन असावा आणि नोझलचा अँगल कसा असावा याकडे लक्ष द्यावे.

             तिसरा तांत्रिक विषय शेतकरी ः हवामान अद्ययावत शेती आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा अनुभव आणि अपेक्षा या विषयावर नवी दिल्ली येथील जी.आय.झेडचे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनिल घोष मार्गदर्शन करतांना म्हणाले जी.आय.झेड. भारतासोबत 50 वर्षांपासून काम करत आहे. जी.आय.झेड. देशातील विविध संस्थांच्या सहकार्याने जैवविविधता, उर्जा शाश्वत उद्योग, शाश्वत आर्थिक विकास यावर काम करत आहे. शेतकर्यांना अॅपद्वारे पिकावरील किड व रोग सल्ला देण्यासाठी जी.आय.झेड.ने महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने फुले बळीराजा अॅप बनविले आहे. सदाहरितक्रांती ही आजची गरज आहे त्यासाठी हवामान अद्ययावत शेती आणि डिजीटल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. जी.आय.झेड. हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. 

                  या कार्यशाळेचे आयोजन संशोधन संचालक व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार आणि सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या तांत्रिक सत्रांमध्ये उपाध्यक्ष म्हणुन डॉ. ए.ए. अत्रे, डॉ. व्ही.ए. स्थुल, डॉ. अधिर आहेर यांनी काम पाहिले. संवाददाता म्हणुन डॉ. भाऊ गावीत, डॉ. सचिन डिंगरे, डॉ. नंदकुमार भुते आणि डॉ. सचिन सदाफळ यांनी काम पाहिले. या सर्व तांत्रिक सत्रांचे समन्वयक म्हणुन डॉ. शुभांगी घाडगे आणि इंजि. मोेहसीन तांबोळी यांनी काम पाहिले. याप्रसंगी शेतकरी, उद्योन्मुख उद्योजक, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी कास्ट-कासम प्रकल्पामुळे मिळालेल्या संधी संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.