कृषी शैक्षणिक क्षेत्र डिजिटलाईज होणे गरजेचे-कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील.
*राहुरी विद्यापीठ, दि. 24 जुलै, 2023*
देशाच्या कृषि क्षेत्राने विविध क्रांती बघितल्या आहेत. सध्या देशाच्या कृषि क्षेत्रात रेनबो क्रांती आणि डिजीटल क्रांती सुरु आहे. जगाचे कृषि शिक्षण हे डिजीटल क्रांती अवलंबत आहे. जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी देशातील कृषि शैक्षणीक क्षेत्र डिजीटलाईज होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि भाकृअप-भारतीय कृषि सांख्यिकी अनुसंधान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणीक व्यवस्थापन प्रणाली आणि नाहेपचे विविध शैक्षणीक उपक्रम या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेला अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपमहासंचालक व नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषि सांख्यिकी अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र प्रसाद, संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते. यावेळी नाहेपचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुदिप मारवहा ऑनलाईन उपस्थित होते. तसेच नाहेपचे प्रकल्पाच्या सहसमन्वय डॉ. अल्का अरोरा, आयटी सल्लागार डॉ. आर.सी. गोयल उपस्थित होते.
यावेळी ऑनलाईन मार्गदर्शन करतांना उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल म्हणाले शैक्षणीक व्यवस्थापन प्रणाली भारतातील सर्व कृषि विद्यापीठांमध्ये सुरु करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्याची कृषि पदवीत प्रवेशापासून ते त्याचा शैक्षणीक प्रवास संपेपर्यंत सर्व माहिती ऑटोमॅटीक जनरेट होऊन त्याचा निकाल व प्रमाणपत्रसुध्दा ऑनलाईन मिळेल. या प्रणालीमुळे प्राध्यापक व इतर कर्मचार्यांवरील ताण कमी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढेल व वेळेची बचत होईल. शैक्षणीक क्षेत्रातील डिजीटल क्रांतीमध्ये नाहेपचे हे एक पुढचे पाऊल आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सुदिप मारवहा, डॉ. अल्का अरोरा, डॉ. आर.सी. गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी.डी. पवार, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, हाळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैक्षणीक व्यवस्थापन प्रणालीचे नोडल अधिकारी डॉ. रवि आंधळे, नाहेपचे नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी कृषि महाविद्यालय, पुणे, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, मुक्ताईनगर, हाळगाव, कराड, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.