महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भाकृअप - नवी दिल्लीच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत अभ्यास दौरा संपन्न .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भाकृअप- नवी दिल्लीच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत अभ्यास दौरा संपन्न*
*राहुरी विद्यापीठ 7मार्च 2024*
शेतकऱ्यांनी शेतामध्ये सेंद्रिय खतांचे प्रमाण वाढवून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. जमिनीचा जितका सेंद्रिय कर्ब जास्त तितकी जमिनीची उत्पादकता जास्त असे प्रतिपादन मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटिल व संचालक, विस्तार शिक्षण डॉ. सी. एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा बोरबन ता. संगमनेर, सावित्रीबाई शेळी शेतकरी उत्पादक कंपनी, सिन्नर व गावरान कोंबड्यांचा कुक्कुटपालन प्रकल्प, तळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, मृदा शास्त्रज्ञ डॉ.अनिल दुरगुडे, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, श्री विजय शेडगे, श्री किरण मगर व श्री राहुल कोराळे उपस्थित होते.
या अभ्यास दौऱ्यामध्ये तळेगाव येथील सौ .अनिता मुकुंद शिंदे त्यांच्या शेवग्याची शेती व गावरान कुकुटपालन प्रकल्पास भेट दिली. त्यांनी कशाप्रकारे कमी खर्चात गावरान कुकुटपालन व्यवसाय करावा व कमी पाण्यातील फायदेशीर शेती याविषयी माहिती दिली. बोरबन तालुका संगमनेर येथील कृषिभूषण आनंदा गाडेकर यांच्या केळी, द्राक्ष व डाळिंबाच्या सेंद्रिय शेतीस तसेच गांडूळ खत प्रकल्प व वर्मी वॉश प्रकल्पास भेट दिली. गाडेकर नाना यांनी आपल्या मार्गदर्शनात सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची प्रत व उत्पादकता वाढविता येते तसेच विषमुक्त शेतीचे महत्व समजावून सांगितले. सिन्नर येथील सावित्रीबाई शेळी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये श्रीमती सुवर्णा काळे यांनी कंपनीच्या स्थापना पासून आज पर्यंतच्या वाटचालीविषयी माहिती दिली. महिलांनी कशा प्रकारे शेळीपालनातून प्रगती साधावी याविषयी मार्गदर्शन केले. शेळीच्या दुधापासून बनवण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती दिली. शेळीच्या लेंडी पासून बनणाऱ्या गांडूळ खत प्रकल्पास शेतकऱ्यांनी भेट दिली.
या अभ्यास दौऱ्यामध्ये चिंचविहिरे, कनगर, तांभेरे व कानडगाव येथील 38 पुरूष व महिला शेतकरी सहभागी झाले होते.