भविष्यातील सिंचन पाणी व्यवस्थापन हे बदलत्या वातावरणाशी सुसंगत असावे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

भविष्यातील सिंचन पाणी व्यवस्थापन हे बदलत्या वातावरणाशी  सुसंगत असावे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

*भविष्यातील सिंचन पाणी व्यवस्थापन हे बदलत्या वातावरणाशी सुसंगत असावे*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 1 ऑक्टोबर, 2024*

          शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा विषय दिवसेंदिवस जटील बनत आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असून भविष्यातील सिंचन पाणी व्यवस्थापन हे बदलत्या वातावरणाशी सुसंगत असावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

             अखिल भारतीय समन्वीत जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पातील भारताच्या पश्चिम विभागातील प्रमुख शास्त्रज्ञांची पंचवार्षिक संशोधन आढावा बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी पंचवार्षिक बैठकीचे प्रमुख व नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी सदस्य डॉ. व्ही.एन. शारदा, पंचवार्षिक बैठकीचे सदस्य व आंध्रप्रदेशातील सी.व्ही. रमण वैश्वीक विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पांडा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. यु.एम. खोडके, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, भुवनेश्वर येथील भारतीय जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती आंतरविद्या जलव्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे व कृषि विद्या विभाग प्रमुख तथा जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.

        यावेळी डॉ. व्ही.एन. शारदा यांनी जलसिंचनाच्या पाण्याचा वापर करतांना पृष्ठभागावरील पावसाचे पाणी, प्रवाही कॅनॉलचे पाणी, शेततळ्यातील पाणी व भुगर्भातील पाणी यांचे एकात्मिक कार्यक्षम वापरासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी देशातील विविध राज्यातील पाणी लवादाच्या गांभीर्याविषयी संबोधन करुन प्रत्येक प्रकल्पाला कृषि पर्यावरणीय हवामान विभागानुसार पीक व पाणी नियोजन करण्याचे आवाहन केले. डॉ. एस.एन. पांडा यांनी आपल्या मनोगतात पाण्याची गुणवत्ता व संवेदन तंत्र आधारीत पाणी व्यवस्थापन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. यु.एम. खोडके यांनी आपल्या मनोगतात पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक सिंचन प्रणालीच्या वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राहुरी येथील जलसिंचन प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पोपळे, डॉ. अनिल दुरगुडे आणि डॉ. प्रशांत बोडके लिखीत जलसिंचन प्रकल्पातील सर्व शिफारशींचे माहिती पुस्तीका व नवसारी गुजरात येथील जलसिंचन प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. एन.जी. सावंत, डॉ. एस.एल. पवार व डॉ. व्ही.आर. नाईक लिखीत ऊस आणि केळी या पिकांची उत्पादकता वाढविण्याविषयी जलव्यवस्थापन तंत्रज्ञान पुस्तीका यांचे विमोचन करण्यात आले. या पंचवार्षिक आढावा बैठकीचे नियोजन डॉ. एस. मोहंती व बैठकीचे सदस्यसचिव डॉ. आर.एन. पांडा यांनी केले होते. यावेळी माजी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके तसेच पश्चिम विभागातील प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. प्रशांत बोडके यांनी मानले.