पोलिसांचा धाक व दरारा वाटला पाहिजे, गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द पोलिसांमध्ये पाहिजे - मुख्यमंत्री ठाकरे

1.

पोलिसांचा धाक व दरारा वाटला पाहिजे, गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द पोलिसांमध्ये पाहिजे - मुख्यमंत्री ठाकरे

ब्युरो प्रतिनिधी-वाहिदशेख

मुंबई-नागपूर: महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी राज्यशासन खंबीर उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

 ताज्या बातम्या साठी लॉग इन करा-

https://BpsLiveNews.in 

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रल हॉलमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (ग्रामीण), सतेज पाटील (शहरे), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर मुख्य सचिव सुरक्षा आणि अपील नितीन गद्रे, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

उपस्थित समुदायाला गुढी पाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजपासून कोरोनाचे निर्बंध उठवले असले तरी पोलिसांच्या कामामध्ये फारसा बदल झालेला नाही. कोरोनामध्ये निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तर आता नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे. आता काळ बदलला आहे, आणि गुन्हेगाराच्या पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस दलाला सर्व सुविधा व अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसदलाला तीन ते साडे तीन हजार दुचाकी आणि चार चाकी अद्ययावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलिसांची घरे, अद्ययावत पोलीस ठाणी, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कृती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

पोलिसांचा धाक व दरारा वाटला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन घुसले पण तुकाराम ओंबाळेसारख्या पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले. गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द पोलिसांमध्ये पाहिजे आणि ती आपल्यात निश्चितपणे आहे याची मला खात्री असून महाराष्ट्र पोलिसदलाचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

अलीकडच्या काळात सायबर क्राइमचा व्हायरस देखील मोठा होतोय, त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. याचा देखील आपले पोलिसदल सक्षमपणे मुकाबला करेल यात शंका नाही. पोलीस आपल्या मदतीला आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कार्यरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.