केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील 'जलशक्ती अभियाना'तील कामांची केली पाहणी प्रशासनाचा आढावा, राळेगणसिद्धी व हिवरेबाजार गावांना भेटी, तीन दिवसीय दौऱ्याची सांगता
अहमदनगर, --
केंद्रांच्या जलशक्ती अभियानातील 'कॅच द रेन' उपक्रमांतर्गत केंद्रीय पथकाने तीन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार सोबत इतर गावांना भेटी देत जलसंधारणांची कामे जाणून घेतली.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव राहुल मलिक व तंत्र अधिकारी डॉ. एस. आर. स्वामी या दोन सदस्यीय तज्ज्ञ पथकाने ५ जूलै ते ७ जूलै २०२२ कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या. केंद्रीय पथक सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जूलै रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विभागांनी केलेल्या जलसंधारण कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. याच दिवशी पारनेर मधील 'हंगा' पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शनपर सूचना दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभुषण अण्णा हजारे यांची 'राळेगणसिद्धी'येथे सदिच्छा भेट घेऊन गावकऱ्यांकडून लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या विविध कामाची माहिती जाणून घेतली.
केंद्रीय पथकाने ६ जूलै रोजी 'हिवरेबाजार' या आदर्शगावास भेट दिली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावामध्ये चालू असलेल्या जलसंधारण विषयक कामांची माहिती दिली.याप्रसंगी राहुल मलिक यांच्याहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. भोयरे पठार व तांदळी वडगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाने गायरान जमिनीवर केलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यात आली. 'वाळकी' येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेल्या सोयाबीन लागवडीची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी नगर-जामखेड रोडवरील 'दरेवाडी' येथील प्रसिद्ध 'हत्तीबारव' येथे 'नगर ट्रेकर्स' या अशासकीय संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामास भेट देऊन पाहणी केली. 'कोल्हेवाडी' येथील सिमेंट नालाबांध ची पाहणी केली. ग्रामस्थ व सरपंच यांना केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान 'कॅच द रेन' उपक्रमा विषयी देऊन जनजागृती करण्यात आली.
अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.